Accident News Kolhapur: ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून दुचाकीस्वार ठार, पट्टणकोडोलीत झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 18:55 IST2023-01-21T18:54:59+5:302023-01-21T18:55:20+5:30
सासरवाडीकडे जात असतानाच काळाचा घाला

Accident News Kolhapur: ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून दुचाकीस्वार ठार, पट्टणकोडोलीत झाला अपघात
तानाजी घोरपडे
हुपरी : ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. महादेव बाबू बिरनाळे - कोळी (वय ४९, रा. वसगडे मळा, ता. करवीर) असे मृताचे नाव आहे. सासरवाडी मांगूर (ता. निपाणी ) येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे हा अपघात झाला. अपघाताची नोंद हुपरी पोलिसात झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, महादेव बिरनाळे हे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत काम करत होते. काल, शुक्रवारची रात्रपाळी संपवून वसगडेतील आपल्या घरी सकाळी येवून सासरवाडी मांगूरकडे नातेवाईकांना भेटण्यासाठी मोपेड दुचाकी क्रमांक (एम.एच-०९- ईपी-९६०१) वरून जात होते.
पट्टणकोडोली बस स्थानकानजीक ऊसाने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टर (एमएच २३ टी ४७९८) ट्रॉलीला ओलांडून पूढे जात असतांना त्यांना ट्रॉलीचा धक्का लागला. यात ते दुचाकीवरुन रस्त्यांवर पडले. दरम्यान ट्रॉलीच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.