अंतिम टप्प्यात अपेक्षित गाळप शक्य
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रवीण कदम
इंगळी : कर्नाटकातून परतणाऱ्या ऊसतोडणी यंत्रणेमुळे जिल्ह्यातील प्रमुख साखर कारखान्यांकडे आता तोडणी फुल झाली आहे. यामुळे गळीत हंगामाच्या अंतिम टप्प्यात साखर कारखान्यांना अपेक्षित गाळप शक्य होत आहे. सन २०२०-२१ च्या गळीत हंगामात ऊसतोडणीसाठी मजूर कमी आल्याने साखर कारखान्यांसाठी अपेक्षित यंत्रणा उभारणे मुश्कील झाले. ४० टक्के मजूर कमी आल्याने साखर कारखान्यांना क्षमतेप्रमाणे गाळप करण्यास मोठ्या अडचणी आल्या. त्यामुळे हा गळीत हंगाम सुरळीत पार करण्याचे कारखाना प्रशासनास आव्हानच होते.
दरम्यान, कर्नाटकातील बऱ्याच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. सदर कारखान्याची तोडणी वाहतूक यंत्रणा ही आता जिल्ह्यातील प्रमुख साखर कारखान्यांकडे येत आहे. आधीच यासाठी कारखान्यांनी नियोजन केले आहे. जास्तीत जास्त प्रमाणात यंत्रणा हजर करून घेतली आहे. त्यामुळे सुरुवातीच्या काळात मोकळे पडलेले कारखान्यांचे अड्डे आता फुल झाले आहेत.
उन्हाळ्यात तोडणी मजुरांकडूनही काम कमी होते. अंतिम टप्प्यात कारखान्यांना ऊस पुरवठा कमी होतो. त्या अनुषंगाने कारखान्यांनी तोडणी मशीनला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सध्या मशीनद्वारे ऊसतोड मोठ्या प्रमाणात दिसत आहे. काही साखर कारखान्यांनी मशीनची संख्या यावेळी इतकी वाढवली आहे, गाळप क्षमतेच्या एक तृतीयांश ऊसपुरवठा मशीन तोडणीद्वारे होत आहे.