मुळी बांधणी वजावट १ टक्काच करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:57 IST2021-02-05T06:57:47+5:302021-02-05T06:57:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : उसाच्या वजनातून ५ टक्के मुळी बांधणी म्हणून वजावट केली जायची. मात्र, त्याविरोधात तक्रार करत ...

मुळी बांधणी वजावट १ टक्काच करा
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उसाच्या वजनातून ५ टक्के मुळी बांधणी म्हणून वजावट केली जायची. मात्र, त्याविरोधात तक्रार करत कायदेशीर मार्गाने लढाई दिल्यानंतर ५ ऐवजी १ टक्काच कपात करा, असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्यांना दिल्याची माहिती आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, जय शिवराय शेतकरी संघटनेचे शिवाजी माने व बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. दगड मारून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत तर त्यासाठी कायद्याचा आधार घेतला तर शेतकऱ्यांचा फायदा कसा होतो, हे यातून दाखवल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. ऊसतोडणी मशीनने तोडलेल्या मुळी बांधणीच्या (पालापाचोळा) नावाखाली ५ टक्के वजनाची कपात केली जायची. याविरोधात तिन्ही संघटनांनी कडाडून विरोध करत कारखान्यांची ही पद्धत कशी चुकीची आहे, हे साखर आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर साखर आयुक्तांनी १ टक्काच कपात करता येईल, असे आदेश काढले. राज्यातील सर्व कारखान्यांना हा निर्णय बंधनकारक राहणार असून, त्याची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार असल्याचे शिवाजी माने यांनी सांगितले.
साधारणत: दहा लाख टन उसाची होणारी कपात थांबल्याने शेतकऱ्यांना थेट २५० कोटी जादा मिळणार आहेत, हे संघटनेचे यश असल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले. सदाशिव कुलकर्णी, बंडा पाटील, श्रीधर शेट्टी, राजेश पाटील आदी उपस्थित होते.
व्याजाबाबत ८ फेब्रुवारीला सुनावणी
अनेक कारखान्यांनी २०१८-१९ हंगामातील एफआरपी वेळेत न दिल्याने त्यांनी व्याज द्यावे, अशी मागणी संघटनेची होती. त्याबाबत १० कारखान्यांनी ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी असल्याचे शिवाजी माने व धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले.