Kolhapur: विद्युत तारेत अडकलेला पतंग काढणे बेतले जिवावर, विजेचा धक्का बसून विद्यार्थ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 11:57 IST2025-11-06T11:56:47+5:302025-11-06T11:57:20+5:30
दुसरा गंभीर जखमी, उचगावातील घटनेने हळहळ

Kolhapur: विद्युत तारेत अडकलेला पतंग काढणे बेतले जिवावर, विजेचा धक्का बसून विद्यार्थ्याचा मृत्यू
उचगाव : विद्युततारेत अडकलेला पतंग काढताना दोन सख्ख्या भावांना जोराचा धक्का बसला. या घटनेत सार्थक नीलेश वळकुंजे (वय १६) याचा मृत्यू झाला असून, दुसरा भाऊ कार्तिक वळकुंजे (१४, धनगर गल्ली, उचगाव) गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार दाखल केले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याबाबत गांधीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उचगाव येथील मंगेश्वर मंदिराच्या मागे बाबानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर विद्युततारेत अडकलेला पतंग काढताना धक्का बसून सार्थक नीलेश वळकुंजे याचा मृत्यू झाला असून, त्याचा भाऊ कार्तिक वळकुंजे गंभीर जखमी झाला आहे.
उडत आलेला पतंग सार्थक याच्या घराजवळ असणाऱ्या विद्युततारेत अडकलेला होता. ते पाहताच सार्थक आणि कार्तिक पतंग काढण्यासाठी शेजारील बंगल्यावरील गच्चीवर गेले. पतंग काढण्यासाठी दहा एमएसएमची लोखंडी सळी तारेत घालताना उच्च भारित विद्युत तारेला सळीचा स्पर्श होताच सार्थक याला जोराचा धक्का बसला, तर त्याचा भाऊ जमिनीवर कोसळला. शेजाऱ्यांनी सीपीआर रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी सार्थक याला मृत घोषित केले. दुसरा भाऊ कार्तिक याला खासगी रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
वळकुंजे कुटुंबीयांना धक्का
सार्थक हा उचगाव पूर्व येथील न्यू माध्यमिक हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचे वडील मेंढपाळ असून, आई गृहिणी आहे. घडलेल्या घटनेमुळे वळकुंजे कुटुंबीयांना धक्का बसला आहे. दरम्यान, गांधीनगर पोलिस ठाण्याचे स.पो.नि. अनिल तनपुरे, पोलिस पाटील स्वप्निल साठे, पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट पाहणी केली.