Kolhapur News: बार काउन्सिलसाठी इच्छुक वकिलांकडून जोरदार फिल्डिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:05 IST2026-01-09T18:03:55+5:302026-01-09T18:05:58+5:30
मार्चअखेरीस होणार मतदान, महिलांसाठी पाच जागा राखीव

Kolhapur News: बार काउन्सिलसाठी इच्छुक वकिलांकडून जोरदार फिल्डिंग
उद्धव गोडसे
कोल्हापूर : महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या संचालक मंडळासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मार्चअखेरीस निवडणूक होण्याची शक्यता असल्याने आत्तापासूनच उमेदवारीसाठी इच्छुक वकिलांकडून जोरदार फिल्डिंग सुरू झाली आहे. यंदा प्रथमच महिलांसाठी पाच जागा राखीव असल्याने महिला वकिलांमध्येही निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे.
महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि सदस्यांना वेगळे वलय असते. यामुळे काउन्सिलवर निवडून येणे प्रतिष्ठेचे मानले जाते. काउन्सिलच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत संपली असून, मार्चअखेरपर्यंत नवीन कार्यकारिणीची निवड करावी, अशा सूचना सर्वोच्च न्यायालय आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाने महाराष्ट्र-गोवा बार काउन्सिलला दिल्या आहेत.
त्यानुसार येत्या दोन आठवड्यांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच इच्छुकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. कोल्हापुरातून जिल्हा बार असोसिएशनचे अनेक माजी अध्यक्ष इच्छुकांच्या यादीत आहेत. त्यामुळे नाव निश्चितीसाठीही अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागल्याची चर्चा आहे.
इच्छुकांची भाऊगर्दी
कोल्हापुरातून बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व जेय्ष्ठ विधिज्ञ अजित मोहिते, शिवाजीराव राणे, गिरीश खडके, रणजित गावडे, संपतराव पवार, सर्जेराव खोत, राजेंद्र चव्हाण इच्छुक आहेत. काउन्सिलचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे यांनी पुन्हा आपली उमेदवारी जाहीर केली असून, महिलांच्या राखीव जागांसाठी शैलजा धोंडीराम चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. सांगलीतून प्रमोद भोकरे, भाऊसाहेब पवार इच्छुक आहेत. सातारा जिल्ह्यातून कराडचे विजय पाटील आणि सातारचे वसंतराव भोसले उमेदवारीसाठी तयारी करीत आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून संग्रामसिंह देसाई पुन्हा इच्छुक असल्याची माहिती ज्येष्ठ वकिलांनी दिली.
कोल्हापूरचे दोन अध्यक्ष
यापूर्वी ज्येष्ठ वकील महादेवराव आडगुळे आणि विवेक घाटगे यांची महाराष्ट्र-गोवा बार काउन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. पी. के. चौगुले, शिवाजीराव चव्हाण, आनंदराव शेळके हे सदस्य होते. कोकणसह सातारा आणि सांगली जिल्ह्याचाही बार काउन्सिलवर वेळोवेळी दबदबा राहिला आहे. दोन्ही राज्यातील सुमारे सव्वा ते दीड लाख वकील मतदारांची यादी लवकरच जाहीर होणार आहे.