ताणतणाव,भविष्याबद्दलचा अंधार हीच आत्महत्येची कारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 12:32 PM2021-04-17T12:32:22+5:302021-04-17T12:35:35+5:30

Suicide Kolahpur : रोगाबद्दलचे भय, आर्थिक ताणतणाव व भविष्याबद्दलची चिंता ही मुख्यत: आत्महत्या करण्यामागील महत्त्वाची कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी गडमुडशिंगी येथे महिलेने मुलीसह, तर शुक्रवारी पन्हाळा तालुक्यातील कळेजवळील गोठे येथील दांपत्याने मुलासह नदीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनांनी समाजमन हादरले. मुलांसह आत्महत्या करण्याचे प्रमाण समाजात वाढले आहे. त्याच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला.

Stress and darkness about the future are the main causes of suicide, corona crisis | ताणतणाव,भविष्याबद्दलचा अंधार हीच आत्महत्येची कारणे

ताणतणाव,भविष्याबद्दलचा अंधार हीच आत्महत्येची कारणे

googlenewsNext
ठळक मुद्देताणतणाव व भविष्याबद्दलचा अंधार हीच आत्महत्येची कारणे भावनिक विश्व समृद्ध करणे हाच उपाय

विश्र्वास पाटील

कोल्हापूर : रोगाबद्दलचे भय, आर्थिक ताणतणाव व भविष्याबद्दलची चिंता ही मुख्यत: आत्महत्या करण्यामागील महत्त्वाची कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी गडमुडशिंगी येथे महिलेने मुलीसह, तर शुक्रवारी पन्हाळा तालुक्यातील कळेजवळील गोठे येथील दांपत्याने मुलासह नदीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनांनी समाजमन हादरले. मुलांसह आत्महत्या करण्याचे प्रमाण समाजात वाढले आहे. त्याच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न लोकमतने केला.

ज्येष्ठ समाज संवादक इंद्रजित देशमुख म्हणाले, लोकांचे भावनिक विश्व संपत येणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यावर जगभर संशोधन सुरू आहे. समाजातील तणावग्रस्तता विविध कारणांनी वाढली आहे आणि त्याचवेळेला आजूबाजूचे हक्काचे आधार खोकले झाले आहेत. त्यामुळे लोक मरणाला जवळ करत आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीत असुरक्षितता नव्हती. आता ढीगभर नातलग असूनही कुणाचा आधार वाटत नाही. बाईला बाप असतो तोपर्यंत माहेर हक्काचे असते. भावाच्या राज्यात ते उपकाराचे होते. त्यामुळे स्वाभिमानी बाई कधीच वडील गेल्यानंतर माहेरकडे हात पसरायला जात नाही. अशा अनेक कारणांनी एकाकीपण वाढत आहे. त्यामुळे संकटाला सामोरे जाण्याऐवजी लोक मृत्यूला जवळ करत आहेत ते फारच हादरवून सोडणारे आहे.

मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कावेरी चौगले म्हणाल्या, कोविडमुळे संपलेला रोजगार, त्यातून आलेली आर्थिक अस्वस्थता, यातून आपल्या जीवनात भविष्यात काही चांगले घडेल असा आशावाद संपुष्टात येणे या सगळ्याचा परिणाम म्हणून सामूहिक आत्महत्या होत आहेत. या आत्महत्यांची कारणे सामाजिकच आहेत. ताण एकट्यापुरताच मर्यादित असतो तेव्हा व्यक्ती आपले जीवन संपवते; परंतु आपण भविष्यात कुटुंबाचा सांभाळ चांगल्या पद्धतीने करू शकतो हा विश्वास संपून जातो तेव्हा कुटुंबासह आत्महत्या करण्याची प्रवृत्ती बळावते. अशा पद्धतीने आत्महत्या करण्याचा निर्णयही कुटुंबप्रमुख म्हणून पुरुषाचाच असतो.

कशा रोखता येतील या घटना..

१.आर्थिक अडचण, कौटुंबिक मालमत्तेतील वादात झालेली फसवणूक, वेगवेगळ्या कारणांनी समाजात, कुटुंबात होणारी मानहानी अशी वरकरणी न दिसणारी अनेक कारणे या घटनांच्या तळाशी असतात. त्यांचा वेळीच शोध घेऊन संबंधित व्यक्तीचा ताण कमी केल्यास, त्याला आधार दिल्यास अशा घटना रोखता येतील.

२.एखादी व्यक्ती आत्ममग्न बनली आहे. समाजापासून तुटली आहे. जगण्यात रस नाही असे वर्तन करते तेव्हा वेळीच सावध होऊन तिच्याशी सतत बोलत राहिले पाहिजे, सकारात्मक ऊर्जा पेरत राहिले पाहिजे.

३.आत्महत्येचा विचार मनात आला की, लगेच तो आत्महत्या करत नाही. अनेक दिवस त्याच्या मनाच्या तळाशी तो विचार मुळे धरत असतो. त्या काळात त्याच्या वर्तणुकीतील नैराश्य हेरून मानसिक आधार देण्याचा प्रयत्न पत्नी, आईवडील, मुलांकडून झाला पाहिजे.

Web Title: Stress and darkness about the future are the main causes of suicide, corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.