इचलकरंजी : येथील मोठे तळे परिसरातील धनगर गल्लीत गेल्या ७ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने येथील संतप्त महिलांनी शनिवारी घागर घेऊन मुख्य मार्गावर गोविंदराव हायस्कूलसमोर रास्ता रोको आंदोलन केले.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच येथील महिलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विविध भागात पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. अवेळी पाणी येणे, कमी दाबाने पाण्याचा पुरवठा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे शनिवारी सकाळी धनगर गल्लीतील महिला व पुरुषांनी रस्ता रोको केला. संतप्त झालेल्या महिलांनी नगरपालिकेच्या कारभाराचा निषेध व्यक्त करत वर्षाची पाणीपट्टी १,८०० रुपये का भरावी, असा सवाल उपस्थित केला. या आंदोलनाची माहिती मिळताच या भागातील लोकप्रतिनिधी व गावभाग पोलीस ठाण्याचे राम पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. यानंतर पाणीपुरवठा विभागाने पाणी वेळेत सोडतो, असे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. यावेळी आक्काताई कोळेकर, सुनीता खोंद्रे, सुनीता घोरपडे, श्रावणी कोळेकर, आदिनाथ कोळेकर, संतोष बंडगर, नासीर शिरगावे यांच्यासह धनगर गल्ली व मोठे तळे परिसरातील नागरिक उपस्थित होते.
इचलकरंजीत मुख्य मार्गावर पाण्यासाठी महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले.