'शक्तिपीठ'चा अट्टाहास सोडा, ८६ हजार कोटींतून रस्त्यांवरील खड्डे भरा - सतेज पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 17:42 IST2025-10-25T17:41:23+5:302025-10-25T17:42:13+5:30
शक्तिपीठ महामार्ग चंदगडमार्गे नेण्याचा प्रयत्न हाणून पाडणार

'शक्तिपीठ'चा अट्टाहास सोडा, ८६ हजार कोटींतून रस्त्यांवरील खड्डे भरा - सतेज पाटील
गडहिंग्लज : बारा जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांचा विरोध असणारा शक्तिपीठ महामार्ग रद्दचा करावा, हीच आपली मागणी आहे. त्याच्या संरेखनात बदल केला तरीदेखील आपला विरोध कायम राहील. मुख्यमंत्र्यांनी ''शक्तिपीठ''चा अट्टाहास सोडावा. त्याऐवजी ८६ हजार कोटींतून राज्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरावेत. त्यामुळे लोकांचे कंबरडे तरी शाबूत राहिल, असा टोला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी हाणला.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज विभागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते गडहिंग्लजला आले होते. शक्तिपीठ महामार्ग चंदगडमार्गे नेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानासंदर्भात छेडले असता त्यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.
दि. ४ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग येथे शक्तिपीठ विरोधी परिषद आयोजित केली आहे. त्याला माजी खासदार राजू शेट्टींसह इंडिया आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. राज्यभरातील शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपला अट्टाहास सोडावा आणि आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
शक्तिपीठ महामार्ग चंदगडमार्गे नेण्याचा प्रयत्न हाणून पाडणार
नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाचे संरेखन बदलून तो चंदगडमार्गे नेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. त्याला आजरा, चंदगड आणि गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी सर्व शक्तिनिशी विरोध करतील. सरकारचा हा जनविरोधी, शेतकरी विरोधी, पर्यावरणाला बाधा आणणारा महामार्ग नक्कीच हाणून पाडू, असा विश्वास शक्तिपीठ विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक तथा श्रमिक मुक्ती दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांनी व्यक्त केला आहे.
चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मागणीनुसार हा मार्ग चंदगडमार्गे नेण्यासाठी संरेखन बदलण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.परंतु, महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील शक्तिपीठ महामार्ग विरोधातील शेतकऱ्यांच्या संघर्षातदेखील आम्ही यापुढेही आघाडीवर राहणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
कॉ. देसाई म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाची गरज नसताना तो शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारला जात आहे. या महामार्गामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होणार असून, महापुरासारख्या महाभयानक संकटाला वारंवार सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळेच या महामार्गाला आमचा तीव्र विरोध आहे. यापूर्वी आजरा येथे भरपावसात झालेल्या महामोर्चाने लोकांच्या मनात असलेला राग यापूर्वी दाखवून दिला आहे. गडहिंग्लज येथेही रास्ता रोकोद्वारे विरोध केला आहे. लवकरच शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची व्यापक बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्ड्यान्नावर, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस अमर चव्हाण, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विद्याधर गुरबे, कॉ. संजय तर्डेकर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.