मराठा आरक्षणासाठी निलजीला रास्ता रोको, तासभर वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 17:21 IST2020-09-14T17:19:38+5:302020-09-14T17:21:06+5:30
मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालेच पाहिजे. या मागणीसाठी संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावर निलजी येथे सकल मराठा समाजातर्फे आज (सोमवारी) दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती.

गडहिंग्लज-संकेश्वर राज्यमार्गावरील निलजी येथे सकल मराठा समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र तारळे यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनात सागर मांजरे, आप्पा शिवणे, सागर कुराडे, विठ्ठल भमानगोळ, प्रितम कापसे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
गडहिंग्लज : मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालेच पाहिजे. या मागणीसाठी संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावर निलजी येथे सकल मराठा समाजातर्फे आज (सोमवारी) दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती.
दरम्यान, आमदार राजेश पाटील यांनी आंदोलकांशी भ्रमनध्वनीवरून चर्चा केली. याप्रश्नी आपण विधीमंडळात चर्चा घडवून आणू. महाआघाडी सरकार मराठा समाजाच्या बाजूने खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे आरक्षण टिकविण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र तारळे, बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष सागर मांजरे, शिवसेना गडहिंग्लज शहरप्रमुख सागर कुराडे, जय गणेश ग्रुपचे संस्थापक आप्पा शिवणे यांची भाषणे झाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक दिनेश काशीद व अविनाश माने यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात भाजपाचे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सावंत, प्रितम कापसे, विठ्ठल भमानगोळ, नांगनूरचे उपसरपंच विकास मोकाशी, शिवसेनेचे मनोज पोवार, शैलेश इंगवले, राहूल शिरकोळे आदींसह विविध पक्षाचे कार्यकर्ते व युवक सहभागी झाले होते.