Kolhapur Accident News: भरधाव डम्परची दुचाकीला धडक; सांख्यिकी अधिकाऱ्याचा मृत्यू, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:39 IST2025-12-11T11:37:44+5:302025-12-11T11:39:51+5:30
एका इंडस्ट्रीजला व्हिजिट देण्यासाठी जात होते

संग्रहित छाया
गोकुळ शिरगाव : नेर्ली येथे भरधाव डम्परने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे वरिष्ठ सांख्यिकी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. सिद्धार्थ सिंह (वय ३६, रा.कोल्हापूर, मूळ रा.अलाहाबाद, उत्तर प्रदेश) असे त्यांचे नाव आहे, तर अभिषेककुमार नर्मदाप्रसाद आगरे (४२, रा.कोल्हापूर, मूळ रा.छिंदवाडा, मध्य प्रदेश) यांना किरकाेळ दुखापत झाली. हा अपघात मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास येथील नेर्ली एमआयडीसी रस्त्यावर झाला.
अभिषेककुमार आगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डम्पर चालक गोविंद धोंडीराम जाधव (रा. उचगाव) याच्याविरुद्ध गाेकुळ शिरगाव पाेलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेककुमार आगरे आणि सिद्धार्थ सिंह राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, कोल्हापूर येथे वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी आहेत. दोघे दुचाकीवरून तामगाव येथील एका इंडस्ट्रीजला व्हिजिट देण्यासाठी जात होते.
दरम्यान, गुरुदत्ता फौन्ड्रीजवळ येताच, डंपरने एमएच०७ सी ६१२५ दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात अभिषेककुमार आगरे यांना किरकोळ दुखापत झाली, तर दुचाकीमागे बसलेले सिद्धार्थ सिंह यांना डाेक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर डम्परचालक गाेविंद जाधव याने घटनास्थळावरून पळ काढला. अधिक तपास फौजदार प्रकाश भवारी करत आहेत.