'टीईटी'विरोधात राज्यव्यापी आंदोलन, कोल्हापुरात ९ नोव्हेंबरला मूक मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:30 IST2025-10-31T12:28:50+5:302025-10-31T12:30:00+5:30
मुंबई येथे झालेल्या सर्व शिक्षक संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला निर्णय

'टीईटी'विरोधात राज्यव्यापी आंदोलन, कोल्हापुरात ९ नोव्हेंबरला मूक मोर्चा
गारगोटी: महाराष्ट्र राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी टीईटी परीक्षा आणि १५ मार्च २०२४ च्या अन्यायकारक शासननिर्णयाविरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाचा पहिला आणि मुख्य टप्पा म्हणून ९ नोव्हेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षकांचा मूक मोर्चा काढण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या सर्व शिक्षक संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव होते. बैठकीत २४ नोव्हेंबर २०२५ रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे होणाऱ्या आंदोलनाला मध्यवर्ती संघटनेचा सक्रिय पाठिंबाही जाहीर करण्यात आला.
संघटनेने यापूर्वी ४ ऑक्टोबरला होणारा मूक मोर्चा शिक्षणमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी १ ऑक्टोबर रोजी नागपूर बैठकीत दिलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आला होता. मात्र, शासनाने अद्याप टीईटी विरोधात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली नाही व टीईटीसंदर्भात शासनाने शिक्षकांच्या बाजूने कोणतीही भूमिका न घेतल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे.या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटनांनी पुन्हा एकत्र येऊन ९ नोव्हेंबरला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर भव्य मूक मोर्चाचे आयोजन केले आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या ऑनलाईन बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत.१ नोव्हेंबरला सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक होणार असून २ ते ७ नोव्हेंबरदरम्यान सर्व खासदार, आमदार आणि मंत्री यांना निवेदने देण्याचे नियोजन आहे. जिल्हा बैठकांनंतर पत्रकार परिषद घेऊन शिक्षकांच्या मागण्यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. ३ नोव्हेंबरला सर्व संघटनांच्या जिल्हाध्यक्षांच्या सहीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला देण्यात येईल."आता नाही तर कधीच नाही" या घोषवाक्याखाली हे आंदोलन पार पडेल.शासनाने दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या बैठकीस केशवराव जाधव, प्रसाद पाटील,चिंतामण वेखंडे,प्रसाद म्हात्रे,राजेश सुर्वे, सतीश कांबळे, श्रीकांत टिपूगडे, साजिद अहमद, सुभाष मस्के, शिवाजी इंगळे, अविनाश भोसले, प्रल्हाद बल्लाळ, भरत मडके, सुरेंद्र गायकवाड आदी संघटना प्रतिनिधी उपस्थित होते.