Kolhapur-Gokul election: ‘त्या’ दूध संस्थांना वगळून निवडणूक घ्या, दुग्ध विभागाकडे बेलवाडे यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 11:44 IST2026-03-11T11:44:32+5:302026-03-11T11:44:48+5:30
११०८ संस्थांबाबत आता मंगळवारी सुनावणी

Kolhapur-Gokul election: ‘त्या’ दूध संस्थांना वगळून निवडणूक घ्या, दुग्ध विभागाकडे बेलवाडे यांची मागणी
कोल्हापूर : ‘गोकुळ’शी संलग्न ११०८ दूध संस्थांना वगळून निवडणूक प्रक्रिया सुरू करा, अशी मागणी वडकशिवाले (ता. आजरा) येथील महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी सहायक निबंधक (दुग्ध) कार्यालयाकडे मंगळवारी केली.
या संस्थाबाबत कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये मंगळवारी सुनावणी झाली. यामध्ये संस्थांच्या अवसायन प्रक्रियेला स्थगिती दिलेल्या कागदपत्रांसाठी विभागीय सहनिबंधक (दुग्ध) मुंबई यांनी मुदत मागितल्याने यावर आता १७ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.
‘गोकुळ’च्या ५४७० मतदार यादीतील ११०८ संस्थांवर प्रकाश बेलवाडे यांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये हरकत घेतली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. दूध संस्था, ‘गोकुळ’ दूध संघ, दुग्ध विभाग यांचेही म्हणणे सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, संघाच्या यादीतील ११०८ संस्थांना वगळून निवडणूक प्रक्रिया सुरू करा, अशी मागणी प्रकाश बेलवाडे यांनी दुग्ध विभागाकडे केली आहे. सभासद यादीबाबतचा गुंता वाढत चालला असून मंगळवारी न्यायालय काय निकाल देते? याकडे दूध संस्थांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह...!
‘गोकुळ’ची निवडणूक मतदार यादीत आडकली आहे. त्यामुळे नियोजित वेळेत निवडणूक होण्याची शक्यता दिवसेंदिवस धूसर बनत चालली आहे.
अंतरिम आदेश रद्द करा...
मतदार यादीत हरकत घेतलेल्या ११०८ पैकी सुमारे तीनशे दूध संस्थांनी दुग्ध विभागाकडे आपले म्हणणे सादर केले आहे. आमच्या संस्थेचे दूध संकलन नियमित सुरू असून लेखापरीक्षण व निवडणुकीची प्रक्रिया वेळेत पार पडल्याने अवसायनाबाबतचा अंतरिम आदेश रद्द करावा, अशी मागणी संस्थांनी मंगळवारी सहायक निबंधक (दुग्ध) यांच्याकडे केली आहे.