Start of Ambabai Shardiya Navratri festival as Mahashakti Kundalini | महाशक्ती कुंडलिनीस्वरूपा अंबाबाई शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ

 शारदीय नवरात्रौत्सवास शनिवारपासून प्रारंभ झाला. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक देवता असलेल्या कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची नवरात्रौत्सवाच्या पहिल्या माळेला महाशक्ती कुंडलिनीस्वरूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा माधव मुनीश्वर व मकरंद मुनीश्वर यांनी बांधली. (छाया : आदित्य वेल्हाळ)

ठळक मुद्देमहाशक्ती कुंडलिनीस्वरूपा अंबाबाई शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभभाविकांविना मंदिर सुने : तोफेच्या सलामीने घटस्थापना

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच शनिवारी भाविकांविना शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. घटस्थापनेनिमित्त देवीची श्री करवीरमाहात्म्यातील वर्णनानुसार महाशक्ती कुंडलिनीस्वरूपामध्ये पूजा बांधण्यात आली. कोरोनामुळे अंबाबाई मंदिर बंद असले तरी भाविकांनी बाहेरून कळसाला नमस्कार करून देवीपुढे हात जोडले.

कोरोनामुळे अजूनही राज्यातील मंदिरे भाविकांसाठी बंद आहेत. नवरात्रौत्सवात मंदिरांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन ती उघडलेली नाहीत; त्यामुळे दरवर्षी लाखोंच्या भाविक संख्येचा आकडा पार करणाऱ्या कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात शनिवारी शांतता होती.

पहाटेच्या काकडआरतीनंतर देवीचा सकाळीचा अभिषेक झाला. त्यानंतर तोफेच्या सलामीने घटस्थापना झाली. मंदिराचे व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला. दुपारच्या आरतीनंतर देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली.

करवीरमाहात्म्यामधील स्तोत्रांमधून देवीचे व्यापक व आदिशक्ती स्वरूप प्रकट होते. ती ब्रह्मा, विष्णू, शिवाची जननी आहे. कधी ती शिवाचे संहारकार्य, कधी ब्रह्माचे निर्माणकार्य, तर कधी विष्णूचे पालनकार्यही करते. तिची महती या नऊ दिवसांतील पूजेतून मांडण्यात येणार आहे.

प्रतिपदेला करवीरनिवासिनी महाशक्ती कुंडलिनीस्वरूपात स्थानापन्न झाली आहे. कुंडलिनी ही आत्मशक्ती, निर्माण, पालन आणि संहाराची शक्ती आहे. ही प्राणशक्ती, आधारशक्ती आणि म्हणूनच परब्रह्मस्वरूपा आहे. ही पूजा माधव मुनीश्वर व मकरंद मुनीश्वर यांनी बांधली.

 

Web Title: Start of Ambabai Shardiya Navratri festival as Mahashakti Kundalini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.