‘थेट पाईपलाईन’ला गती
By Admin | Updated: February 2, 2015 00:23 IST2015-02-02T00:19:45+5:302015-02-02T00:23:30+5:30
४८८ कोटींची योजना : पुईखडी परिसरात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू

‘थेट पाईपलाईन’ला गती
गणेश शिंदे -कोल्हापूर - काळम्मावाडी थेट पाईपलाईनच्या कामास सुरुवात झाली असून, कामाची गती पाहता आगामी दीड-दोन वर्षांत कोल्हापूरकरांचा पाण्याचा प्रश्न संपुष्टात येण्याची शक्यता आहे. पाईपलाईनच्या कामास पुईखडी येथून सुरुवात झाली आहे. -गेल्या २० वर्षांत शहराचा विस्तार वाढल्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याचा तुटवडा पडू लागला आहे. जिल्ह्णातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी तत्कालीन कांँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून ही थेट पाईपलाईन योजना मंजूर करून आणली. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत थेट पाईपलाईनची योजना मार्गी लावली नाही तर पुढील निवडणूक लढविणार नाही, अशी गर्जना केली होती. दरम्यान, महापालिकेने या योजनेसाठी निविदा काढल्या. या योजनेचा ठेका हैदराबाद येथील जी. के.सी. कंपनीला दिला. पुईखडी येथे जेसीबीने खोदकाम करून जलवाहिनी जोडणी सुरू आहे. आजपर्यंत राज्य व केंद्र शासनाने एकूण ४८८ कोटी रुपयांच्या प्रकल्प खर्चापैकी दोघांनी प्रत्येकी ५० टक्के रक्कम महापालिका प्रशासनाला दिली आहे. त्यामुळे हे काम सुरू झाले आहे.
करवीर तहसीलदारांनी मंजुरीचे पत्र दिल्यानंतर पुईखडी येथे कामास सुरुवात झाली, पण जलवाहिनी टाकण्यासाठी (उदा. रस्त्याकडील भाग, विद्युत खांब, अंतर्गत वाहिन्या, वृक्षतोड) पीडब्ल्यूडी व वनविभागाची परवानगी घ्यावी लागते. त्यांच्या परवानगीनंतर पुढील काम सुरू होणार आहे. योजनेच्या कामासाठी संबंधित कंपनीला २७ महिन्यांचा कालावधी दिल्यामुळे ही योजना २०१७ ला पूर्ण होणार आहे. त्यानंतर शहरातील नागरिकांना मुबलक व शुद्ध पाणी मिळणार आहे.
सध्याच्या जलवाहिनीमधून २०३० सालचा विचार करता शहराला १८० दशलक्ष मीटर पाणी मिळणार आहे. २०४५ सालापर्यंतची लोकसंख्येनुसार २३८ दशलक्ष मीटर जलविसर्गासाठी अद्ययावत ‘स्पायरल वेल्डेड’ पद्धतीची जलवाहिनी वापरण्यात आली आहे.
थेट पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी देण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध विभागांच्या मंजुरीसाठी महापालिका प्रशासन पाठपुरावा करीत आहे.
- मनीष पवार, जलअभियंता, कोल्हापूर महापालिका