Kolhapur News: नैराश्यातून मुलाने जीवन संपवले, धक्क्याने वडिलांचाही झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 13:32 IST2023-08-02T13:32:00+5:302023-08-02T13:32:22+5:30
केवळ २४ तासांच्या कालावधीत पितापुत्राच्या झालेल्या या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने सर्वत्र हळहळ

Kolhapur News: नैराश्यातून मुलाने जीवन संपवले, धक्क्याने वडिलांचाही झाला मृत्यू
हुपरी : सततच्या ताणतणावामुळे आलेल्या नैराश्यातून मुलाने घरांतील छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्का सहन न झाल्याने मंगळवारी सायंकाळी वडिलांचाही मृत्यू झाला. पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. विजय आनंदा परीट (वय ३२) असे मुलाचे नाव असून आनंदा परीट (रा. नवीन बसस्थानकाजवळ पट्टणकोडोली) अशी त्या वडिलांचे नाव आहे.
याबाबत पोलिसांतून समजलेली माहिती अशी, विजय परीट हा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात कामास होता. नवीन बसस्थानक परिसरात त्याच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे काही महिन्यांपासून घरचे सर्व जण इंगळी रस्त्याला भाड्याच्या घरात राहायला गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून विजय हा कोणत्या तरी कारणातून सतत तणावात असायचा, तसेच त्याच्या मोबाइलवरील स्टेट्सही तणावात असल्यासारखेच तो ठेवायचा. त्यामुळे विजयने कोणत्या तरी तणावातूनच सोमवारी घरी कोणीही नसल्याचे पाहून त्याने घरातील छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
हा धक्का सहन न झाल्याने त्याचे वडील आनंदा परीट यांचाही आज(मंगळवार) सायंकाळी मृत्यू झाला. केवळ २४ तासांच्या कालावधीत पितापुत्राच्या झालेल्या या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतची फिर्याद श्रीरंग परीट यांनी हुपरी पोलिसांत दिली आहे.