कोल्हापूर : ग्रोबझ ट्रेडिंग कंपनीकडून गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला पसार आरोपी सोमनाथ मधुसुदन कोळी (वय ३६, रा. दौलतनगर, राजारामपुरी, कोल्हापूर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बेळगाव बस स्थानकातून अटक केली.
गुन्हा दाखल होताच गेल्या तीन वर्षांपासून पसार असलेला कोळी अखेर गुरुवारी (दि. २५) सकाळी पोलिसांच्या हाती लागला. गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार विश्वास कोळी याचा हा मेहुणा आहे.गुंतवणुकीवर कमी कालावधित मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष ग्रोबझ ट्रेडिंग कंपनीने दाखवले होते. याला भुलून सुमारे २६ हजार गुंतवणूकदारांनी हजारो कोटींची गुंतवणूक केली. गुंतवणुकीची रक्कम आणि परतावे वेळेत परत न दिल्याने कंपनीसह २४ जणांवर सप्टेंबर २०२२ मध्ये शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून, कंपनीचा कर्मचारी सोमनाथ कोळी पसार होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने रखडलेल्या तपासावरून तपास अधिकाऱ्यांना धारेवर धरताच तपास गतिमान झाला आहे.
पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पसार आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहे. या पथकाने सोमनाथ कोळी याला बेळगावमधील बस स्थानकातून अटक केली.पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार युवराज पाटील, अमित सर्जे, शुभम संकपाळ यांच्या पथकाने आरोपीला अटक केली. त्याचा ताबा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे देण्यात आला. पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांच्याकडून अधिक तपास सुरू आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन इंगळे यांनी केले आहे.पुणे, जयसिंगपूर, बंगळुरूमध्ये वास्तव्यगुन्हा दाखल होताच पसार झालेला सोमनाथ कोळी वर्षभर पुण्यात लपला. त्यानंतर वर्षभर जयसिंगपूर येथे येऊन राहिला होता. गेल्या १३ महिन्यांपासून तो बंगळुरू येथे एका खासगी कंपनीत काम करीत होता. या काळात तो सातत्याने त्याचे मोबाइल नंबर बदलत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
कंपनीत महत्त्वाची जबाबदारीगुन्ह्याचा मुख्य सूत्रधार विश्वास कोळी याचा मेहुणा सोमनाथ कोळी याच्याकडे कंपनीत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या. तो ग्रोबझ निधी बँकेचे काम पाहत होता. कंपनीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये त्याचा सहभाग होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर बँकेतील सोने आणि रोकड यानेच काढल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. त्यामुळे त्याच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- एकूण आरोपी - २४
- अटक आरोपी - १९
- शोध सुरू - ५
Web Summary : Somnath Koli, wanted in the Grobz trading fraud case, was arrested in Belgaum after three years on the run. He is related to the scam's mastermind. Koli is accused of enticing investors with high returns and played a key role in the company's finances.
Web Summary : ग्रोबज़ ट्रेडिंग धोखाधड़ी मामले में वांछित सोमनाथ कोली को तीन साल फरार रहने के बाद बेलगाम में गिरफ्तार किया गया। वह घोटाले के सरगना का रिश्तेदार है। कोली पर निवेशकों को उच्च रिटर्न का लालच देने और कंपनी के वित्त में महत्वपूर्ण भूमिका निभाने का आरोप है।