कोल्हापूरजवळ स्लीपर बसचा अपघात, छत्रपती संभाजीनगरचा एकजण ठार; चार गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 05:05 IST2025-02-03T05:04:05+5:302025-02-03T05:05:45+5:30
या अपघातात ३० पेक्षा जास्त जण जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरजवळ स्लीपर बसचा अपघात, छत्रपती संभाजीनगरचा एकजण ठार; चार गंभीर
कोल्हापूर : गोव्यावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी खासगी आराम बस करवीर तालुक्यातील कांडगाव येथे मध्यरात्री उलटून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. अमोल परशुराम भिसे (वय ४०, रा. चौधरी भूमी, सिडको महानगर, छत्रपती संभाजीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या अपघातात ३० पेक्षा जास्त जण जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
प्रत्यक्षदर्शी टूर गाईड अतिष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी कंपनीतील सुमारे १४३ कर्मचारी ३० जानेवारीला चार खासगी आरामबसमधून सहलीसाठी गोव्याला गेले होते. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता ते गोव्यावरून छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने परत निघाले.
बसचा अपघात कसा झाला?
रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी कणकवलीमध्ये जेवण केले. तेथून फोंडा घाट मार्गे कोल्हापूरकडे ते निघाले. तेथून छत्रपती संभाजीनगरकडे ते निघणार होते. यातील एक आराम बस (डी डी ०१ टी ९३३३ ) रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कांडगाव येथील शेरीच्या माळ जवळच्या वळणावर शिंदे मळा येथे उलटून अपघात झाला.
बस तीव्र वळण घेताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. या बसमध्ये चालकासह ३५ प्रवासी होते. यात तीन महिलांचा समावेश होता. सर्व प्रवासी २५ ते ४० या वयोगटातील आहेत. बस उलटून अपघात झाल्याचे समजतात क्षणार्धात तेथील ग्रामस्थ घटनास्थळी जमले.
त्यांनी काही जणांना बसमधून बाहेर काढले. यावेळी एकजण जागीच ठार झाल्याचे निदर्शनास आले. चार गंभीर जखमींना तात्काळ कोल्हापूरला सीपीआर आणि खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन असून मदत कार्याला गती दिली.