Kolhapur: नगरपालिका मतमोजणीला उरले सहा दिवस शिल्लक, विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यास मनाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 19:02 IST2025-12-15T19:01:53+5:302025-12-15T19:02:58+5:30
Local Body Election Result: जिल्हाधिकाऱ्यांकडून २०० मीटर परिसरात निर्बंध लागू, दुपारपर्यंत प्रक्रिया संपणार

संग्रहित छाया
कोल्हापूर : जिल्ह्यातील १० नगर परिषद व तीन नगरपंचायतींची निवडणुकीच्या मतमोजणीसाठी फक्त सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. पन्हाळा, मलकापूर, वडगांव, हुपरी, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, गडहिंग्लज, कागल, मुरगूड या नगर परिषद व हातकणंगले, आजरा व चंदगड नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर राेजी मतदान झाले होते. त्यानंतर बरीच आकडेमोड करून शांत राहिलेल्या कार्यकर्त्यांची उत्सुकता आता पुन्हा वाढली आहे.
नगर परिषद व नगरपंचायतीच्या मतदारसंघनिहाय मतमोजणी ठिकाणच्या परिसरात जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये रविवार, २१ डिसेंबर रोजी सकाळी ०७ वाजल्यापासून ते मतमोजणी संपेपर्यंत निर्बंध लागू केले आहेत. मतमोजणी दिवशी मतमोजणी ठिकाणापासून २०० मीटर सभोवतालच्या परिसरात मतमोजणी कर्मचारी पुरवठादार, उमेदवार व त्यांनी नियुक्त केलेल्या प्रतिनिधी व्यतिरिक्त कोणाही व्यक्तीला प्रवेश करणे. मतमोजणी कालावधीत अथवा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या लाऊड स्पिकरचा वापर सक्षम पोलिस अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगी शिवाय रस्त्यावर, व्यासपीठावर किंवा फिरत्या वाहनावर बसवून करणे, आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारचे भाषण करणे, नक्कल करणे, चित्रे/चिन्हे रेखाटणे अगर त्यांचे प्रदर्शन करणे अथवा तत्सम कृती करणे, मतमोजणी ठिकाणापासून २०० मीटर परिसरामध्ये मोटरगाड्या, वाहनांचा वापर करणे अथवा थांबविणे, (निवडणुकीच्या अनुषंगाने वापरात असलेली शासकीय वाहने वगळून) यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
मतमोजणी ठिकाणाच्या २०० मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने मोबाइल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक सहित्य बाळगणे, वापरणे. (भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व मतमोजणीसाठीच्या कामाशी निगडित कर्मचारी वगळून) मतमोजणी ठिकाणी उमेदवार मतमोजणी प्रतिनिधी वा इतर प्रतिनिधी यांनी मोबाइल वापरणे किंवा फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे, तसेच गोपनीयतेचा भंग होईल अशी कृती करणे, कोणत्याही प्रकारची शस्त्रे, अग्नी शस्त्रे व दारुगोळा इ. ची वाहतूक, जवळ बाळगणे अथवा वापर करणे. (सुरक्षेच्या कारणास्तव नेमले पोलीस अधिकारी कर्मचारी वगळून.) यावर निर्बंध आहेत.
मतमोजणीची ठिकाणे
पन्हाळा - पन्हाळा नगर परिषद सांस्कृतिक हॉल, मयूर उद्यान
मलकापूर - मलकापूर नगर परिषद कार्यालय, दुसरा मजला सभागृह
वडगांव - मराठा समाज सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज चौक
हुपरी - सभागृह, केंद्रीय प्राथमिक शाळा
हातकणंगले - पहिला मजला सभागृह, तहसीलदार कार्यालय
जयसिंगपूर - सिद्धेश्वर यात्री निवास येथील नगर परिषद कार्यालय
शिरोळ - सभागृह पहिला मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
कुरुंदवाड - जिम्नॅशियम हॉल, तबक उद्यान
गडहिंग्लज - पॅव्हेलियन इमारत, गांधीनगर
आजरा - मुख्य सभागृह, नवीन प्रशासकीय इमारत
चंदगड - चंदगड तहसीलदार कार्यालय
कागल - सवित्रीबाई फुले मार्केट, जयसिंगराव पार्क
मुरगूड - डॉ. बाबासाहेब आंबडेकर बौद्ध विहार
विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यास मनाई
निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूक मतमोजणीची प्रक्रिया विनाअडथळा व भयमुक्त वातावरणात पार पाडली जाणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये २१ डिसेंबर रोजी विजयी उमेदवारांची विजयी मिरवणूक काढणे. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्ते / कोणत्याही व्यक्ती राजकीय पक्ष/संस्था यांनी गावातून / शहरातून मिरवणूक /रॅली काढणे. सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळणे अथवा त्याचा वापर करणे. फटाके लावणे/फोडणे, या कृती करण्यास मनाई केली आहे.
हा आदेश २१ डिसेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रासाठी लागू राहिल. हा आदेश तातडीचे प्रसंगी एकतर्फी देण्यात येत आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.