Navratri -शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंहवाहिनी दुर्गा... अंबाबाईची प्रतिकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 15:15 IST2019-09-20T15:13:10+5:302019-09-20T15:15:12+5:30
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुंभार गल्ल्यांमध्ये दुर्गेच्या मूर्ती घडविण्याची लगबग सुरू आहे. सिंहवाहिनी दुर्गा, महिषासुरमर्दिनी, श्री अंबाबाईची प्रतिकृती, बंगाली पद्धतीच्या कोरीव मूर्ती अशा विविध प्रकारांतील मूर्ती घडविल्या जात आहेत.

शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शाहूपुरी कुंभार गल्लीत कुंभार बांधवांकडून दुर्गेच्या मूर्ती घडविल्या जात होत्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुंभार गल्ल्यांमध्ये दुर्गेच्या मूर्ती घडविण्याची लगबग सुरू आहे. सिंहवाहिनी दुर्गा, महिषासुरमर्दिनी, श्री अंबाबाईची प्रतिकृती, बंगाली पद्धतीच्या कोरीव मूर्ती अशा विविध प्रकारांतील मूर्ती घडविल्या जात आहेत.
महापुराचा फटका बसलेल्या कुंभार बांधवांचा गणेशोत्सव यंदा पाण्यात गेला आहे. त्याची धास्ती अजूनही मनातून गेली नसल्याने काही कुंभारांनी दुर्गेच्या मूर्ती घडविल्या नाहीत. सार्वजनिक मंडळांकडून गणेशमूर्तींप्रमाणे मोठ्या संख्येने देवीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जात नाही.
आसुराचा संहार करून जगाचे पालन करणाऱ्या या स्त्रीशक्तीचे नवरात्रौत्सवातील धार्मिक विधी कडक असतात; शिवाय घटस्थापना, रोजची पूजा, विधी, जागर या गोष्टी चोखपणे पार पाडाव्या लागतात. त्यामुळे वर्षानुवर्षे या नवरात्रौत्सव साजरा करणाºया मंडळांकडूनच दुर्गेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते.
कोल्हापूर शहरात २०० ते ३०० मंडळांकडून दुर्गेच्या मूर्ती प्रतिष्ठापित केल्या जातात. नवरात्रौत्सवाला आता अवघे नऊ दिवस राहिल्याने या दुर्गेच्या मूर्ती घडविण्यासाठी कुंभार बांधवांची लगबग सुरू आहे. शाहूपुरी कुंभार गल्ली, गंगावेश, बापट कॅम्प येथील मोजक्या कुंभारांकडून या मूर्ती बनविल्या जात आहेत.
महापूर गेला असला तरी आता पुन्हा हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने आणि गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा सुरू झालेल्या पावसाच्या तडाख्यामुळेअजूनही कुंभारांमध्ये धास्ती आहे. त्यात मूर्ती वाळण्यासाठीही कमी कालावधी राहिल्याने यंदा मूर्ती कमी प्रमाणात घडविल्या जात आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही सिंहवाहिनी दुर्गेच्या मूर्तींना अधिक मागणी आहे. या मूर्ती अगदी दोन-अडीच फुटांपासून ते सात-आठ फुटांपर्यंत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची प्रतिकृती बनविण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या मूर्तीही सुबक रीतीने आकाराला येत आहेत. बारीक कलाकुसर असलेल्या बंगाली पद्धतीेच्या मोठ्या मूर्ती भाविकांना भुरळ घालतात. यंदा या मूर्तींचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
दुर्गेच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणाऱ्या मंडळांची संख्या कमी आहे. त्यात यंदा महापुराचाही परिणाम मंडळांवर आणि मूर्ती बनविण्यावर झाला आहे. आत्ता हळूहळू मूर्तींची चौकशी सुरू झाली आहे.
- संभाजी माजगांवकर,
मूर्तिकार संघटना