Kolhapur: चांदी पावणेदोन लाखांवर, हुपरीतील कारागीर मात्र वाऱ्यावर; दिवाळी करायची कशी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 15:43 IST2025-10-17T15:41:44+5:302025-10-17T15:43:33+5:30
एका दागिन्यासाठी २८ कारागिरांचा लागतो हात

Kolhapur: चांदी पावणेदोन लाखांवर, हुपरीतील कारागीर मात्र वाऱ्यावर; दिवाळी करायची कशी?
हुपरी (कोल्हापूर) : चंदेरीनगरी म्हणून ओळख असलेल्या हुपरीतील चांदी उद्योगावर ऐन दिवाळीत मंदीचे ढग आले आहेत. चांदीचा दर किलोला विक्रमी १ लाख ७५ हजार रुपर्यावर जाऊनही दराचा आलेख चढताच राहत असल्याने उद्योजक, कारागीर आणि पूरक व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
हुपरी शहरातील चांदी उद्योगात देशभरातील व्यापाऱ्यांना दागिने बनवून देण्याची १२५ वर्षांची परंपरा आहे. चांदीच्या वाढत्या दराबाबत सरकारने वेळीच हस्तक्षेप केला नाही तर हा उद्योग कोलमडू शकतो, अशी भीती कारागिरांमधून व्यक्त होत आहे.
दोन लाख चांदी कारागीर
हुपरी आणि परिसरातील रेंदाळ, पट्टणकोडोली, यळगूड, तळंदगे, कर्नाटकातील मांगूर, कुन्नुर, बारवाड आदी दहाबारा गावात चांदीचे दागिने तयार करुन देणारे देशभरातून आलेले सुमारे दोन लाख कारागीर आहेत. कामाचे स्वरुप आणि कारागिराचे कौशल्य यानुसार त्यांची दररोजची मजुरी २०० ते ५०० रुपये आहे.
दिवाळी करायची कशी?
मंदीच्या सावटामुळे चांदी उद्योगावर अवलंबून असलेल्या कारागिरांच्या रोजीरोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. हे कारागीर स्थानिकांबरोबरच उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक राज्यातून आहेत.
तसेच घरात बसून काम करणाऱ्या महिलांचा रोजगारही प्रभावित झाल्याने दिवाळी करायची तरी कशी, असा प्रश्न कारागिरांपुढे आहे.
दरवाढ अनियंत्रितच
हुपरी चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन खोत म्हणाले, वायदे बाजारातील कागदोपत्री व्यवहारामुळे चांदी आणि सोने दरात होणारी अनियंत्रित वाढ चांदी उद्योगाला नुकसानकारक ठरत आहे. सरकारने वायदे बाजारातील कागदोपत्री व्यवहारावर बंदी घालून प्रत्यक्ष व्यवहारांची अट घालणे आवश्यक आहे.
एका दागिन्यासाठी २८ कारागिरांचा लागतो हात
चांदीवर कारागिरी करण्यासाठी ती वेगवेगळ्या प्रक्रियातून जावी लागते. २८ कारागिरांच्या हाताखालून गेल्यानंतरच चांदीचा एक दागिना तयार होतो.
३ टनावरून ५०० किलोंवर
हुपरी पंचक्रोशीत दररोज सुमारे तीन टन चांदीचे दागिने तयार होत होते. दरवाढीनंतर आता जेमतेम ५०० किलो चांदीचे दागिने तयार होत आहेत, असे चांदी उद्योजकांनी सांगितले.
चांदी हस्तकला उद्योगाला वाचविण्यासाठी सरकारने दागिन्यांच्या विक्रीसाठी नियमावली तयार करणे आवश्यक आहे. तसेच दरात अनियंत्रित वाढ रोखण्यासाठी कठोर पावले उचलली तरच हा व्यवसाय टिकून राहून शकतो. - महेंद्र चंद्रकांत सपाटे, उद्योजक