गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 16:17 IST2025-12-14T16:15:00+5:302025-12-14T16:17:03+5:30
Kolhapur Crime News: कोल्हापूरमधील रंकाळा तलावात एका गर्भवती महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेने खळबळ माजली. पोलिसांनी तपास केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडला झाला.

गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
कोल्हापुरातील एक महत्त्वाचं पर्यटन ठिकाण असलेल्या रंकाळा तलावात एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळून आला. शनिवारी लोकांची गर्दी असतानाच गर्भवती महिलेला मृतदेह दिसला. यामुळे खळबळ माजली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास केला असता, गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा ज्ञानेश्वर पवार (वय २७) असे मयत गर्भवती महिलेचे नाव आहे. नेहा या मूळच्या बेळगाव जिल्ह्यातील चिखली कणकुंबी येथील रहिवाशी होत्या.
रंकाळा तलावात उडी मारून आत्महत्या
रंकाळा तलाव परिसरात राजघाटाजवळ १४ डिसेंबर रोजी सकाळी मृतदेह तरंगताना दिसला. याची माहिती पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदन करून महिलेचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला.
गोव्यावरून कोल्हापूरला आल्या होत्या नेहा
मूळच्या बेळगाव जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या नेहा या पती ज्ञानेश्वर पवार यांच्यासह गोव्यातील म्हापसा येथे राहत होत्या. ज्ञानेश्वर पवार हे बांधकाम साईटवर काम करतात. १२ डिसेंबर रोजी सकाळी पतीला न सांगता घरातून बाहेर गेल्या होत्या.
दिवस लोटला तरी त्या परत घरी आल्या नाहीत. त्यामुळे ज्ञानेश्वर पवार यांनी म्हापसा पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात असतानाच शनिवारी सकाळी त्यांचा रंकाळा तलावामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.
नेहा यांच्याजवळ मोबाईल होता. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी मोबाईलची तपासणी केली. त्यातील क्रमांक मिळवून नेहा यांचे आईवडील आणि पती यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर नेहा यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली.
नेहा यांनी आत्महत्या का केली?
नेहा या साडेपाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. त्यांच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत सांगितले की, 'नेहा एका महिन्यापासून नैराश्यात होती. आम्ही तिला समजावून सांगितले. तिला आधार दिला, पण तिचे मन स्थिर नव्हते. शुक्रवारी ती कुणालाच काही न सांगता घरातून बाहेर पडली आणि टोकाचे पाऊल उचलले."