कोल्हापूर : सलग पन्नास वर्षे मंगळवार पेठेतील सर्व तालीम संस्था, मंडळे यांच्या वतीने मिरजकर तिकटी येथे आठवडाभर शिवजयंती उत्सव जल्लोषात केली जाते. पण, यंदा कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासकीय निर्बंध पाळून गुरुवारी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता मोजक्याच पाच महिलांच्या उपस्थितीत शिवजन्मकाळ सोहळा होत आहे. त्यावेळी पाळणा पूजन, सुंटवडा वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाबूराव चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिली.
मंगळवार पेठेच्या वतीने १९७० पासून मिरजकर तिकटी येथे संयुक्ततेने आठवडाभर पोवाडे, व्याख्यानमाला, मर्दानी खेळ, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात, पण यंदा कोरोना महामारीमुळे शासकीय आदेशाचे पालन करत गर्दी न करता आपापल्या घरीच थांबून शिवपूजन, शिवचरित्र वाचून शिव छत्रपतींना अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.