दुबई, नेपाळची घडवली हवेतच सफर, टूर कंपनी लाखो रुपये घेऊन रफूचक्कर; कोल्हापुरातील शौर्य यात्रा कंपनीवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 17:49 IST2025-07-30T17:49:18+5:302025-07-30T17:49:40+5:30
पर्यटकांना पश्चात्ताप

संग्रहित छाया
कोल्हापूर : शौर्य यात्रा कंपनीच्या माध्यमातून देश-विदेशात सहल घडविण्याचे आमिष दाखवून पर्यटकांची साडेचार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत यात्रा कंपनीचा प्रमुख मयुरेश नामदेव वाघ (वय २८, रा. राधाकृष्णनगर, जळगाव) याच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. महेश मनोहर पन्हाळकर (६१, रा. लक्ष्मीपुरी, कोल्हापूर) यांनी सोमवारी (दि. २८) फिर्याद दिली.
शौर्य यात्रा कंपनीचे कार्यालय लक्ष्मीपुरीतील फोर्ड कॉर्नर येथे आहे. या कंपनीकडून देश-विदेशात सहलींचे आयोजन केले जाते. कंपनीच्या जाहिराती पाहून महेश पन्हाळकर यांनी कुटुंबासह दुबई सहलीसाठी दोन लाख ३२ हजार रुपये कंपनीच्या कार्यालयात मयुरेश वाघ याच्याकडे भरले. तसेच त्यांचे मित्र नरेंद्र माधव कुलकर्णी यांनी दुबई, नेपाळ आणि चारधाम यात्रेसाठी १ लाख ५४ हजार रुपये भरले.
सुरेश राजाराम देसाई यांनी नेपाळ सहलीसाठी ३८ हजार ५०० रुपये भरले. राजेंद्र रघुनाथ वेल्हाळ यांनी केरळ सहलीसाठी २३ हजार ४०० रुपये भरले, तर विश्वनाथ प्रल्हाद गुळवणी यांनी चारधाम यात्रेसाठी ३२ हजार रुपये भरले होते. मे २०२४ मध्ये पैसे घेऊन कंपनीने सहलीचे नियोजन केले नाही. वारंवार मागणी करूनही पैसे परत न मिळाल्याने पन्हाळकर यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक खंडू गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
अनेकांना घातला गंडा
शौर्य यात्रा कंपनीने राज्यातील शेकडो पर्यटकांना गंडा घातला आहे. तीन व्यक्तींचे पैसे भरल्यानंतर चौथ्या व्यक्तीला मोफत सहल घडविण्याचे आमिष त्यांनी दाखवले होते. याशिवाय वेळोवेळी सवलती जाहीर करून त्यांनी पर्यटकांना आकर्षित केले. विविध शहरांमधील हॉटेल्समध्ये सेमिनार घेऊन त्यांनी पर्यटकांना गंडा घातला. यात शहरातील अनेकांचा समावेश आहे.
पर्यटकांना पश्चात्ताप
सहलीसाठी गेल्यानंतर यात्रा कंपनीकडून योग्य नियोजन केले जात नाही. राहण्याची आणि जेवणाची हेळसांड होते. प्रवासासाठी अस्वच्छ वाहनांचा वापर केला जातो. तक्रारींची वेळेत दखल घेतली जात नाही, असे अनुभव पर्यटकांनी सांगितले. तक्रारींचा ओघ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कार्यालयाला टाळे
पोलिस उपनिरीक्षक खंडू गायकवाड हे मंगळवारी तपासासाठी फोर्ड कॉर्नर येथील शौर्य यात्रा कंपनीच्या कार्यालयात गेले होते. मात्र, छोट्याशा गाळ्यातील कंपनीचे कार्यालय बंद होते. गेल्या महिनाभरापासून कार्यालय बंद असल्याची माहिती शेजारच्या गाळेधारकांकडून मिळाली.