Kolhapur: ‘गोकुळ’ अध्यक्षपदाचा सर्वमान्य चेहरा शशिकांत पाटील-चुयेकर शक्य
By राजाराम लोंढे | Updated: May 19, 2025 14:21 IST2025-05-19T14:20:23+5:302025-05-19T14:21:59+5:30
संस्थापकांचा मुलगा म्हणून नाव पुढे

Kolhapur: ‘गोकुळ’ अध्यक्षपदाचा सर्वमान्य चेहरा शशिकांत पाटील-चुयेकर शक्य
राजाराम लोंढे
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाचा सर्वमान्य चेहरा म्हणून शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव पुढे आले आहे. ‘शशिकांत’ हे संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांचे सुपुत्र आहेत. ते आमदार सतेज पाटील यांचे समर्थक असले तरी संस्थापकांच्या मुलाला संधी दिल्याने त्यांच्या नावाला कोणाचा थेट विरोध होण्याची शक्यता कमी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप आल्यानंतरच राजीनामा देऊ, अशी भूमिका अरुण डोंगळे यांनी घेतली आहे. तर, उद्या मंगळवारी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटून वस्तुस्थिती सांगू व डोंगळेंसह सगळ्यांना मान्य होईल असा अध्यक्षपदाचा चेहरा ठरवल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितल्याने ‘तो’ चेहरा कोण? याविषयी उत्सुकता लागली आहे.
महायुती म्हणून अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अजित नरके, नविद मुश्रीफ, प्रा. किसन चौगले यांच्या नावाची चर्चा आहे. विश्वास पाटील हे इच्छुक नाहीत, तर ‘नविद’ अध्यक्ष होणार नाही, हे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे. नरके यांच्याकडे क्षमता असली तरी ते कोठेपर्यंत नाव रेटतात, यावर बरेच अवलंबून आहे. सामान्य कार्यकर्त्याला संधी म्हणून प्रा. चौगले यांचेही नाव पुढे येऊ शकते.
पण, महायुतीच्या आडून सतेज पाटील यांना एकाकी पाडण्याचा डाव, त्यातून मंत्री मुश्रीफ यांची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, अशी कोंडी कशी फोडायची? हे मुश्रीफ यांना चांगले माहिती आहे. शशिकांत पाटील हे सतेज पाटील यांचे समर्थक असले तरी ते संस्थापकांचा मुलगा आहेत, त्यात आमदार चंद्रदीप नरके यांचे मामेभाऊ, तर संचालक अमरसिंह पाटील यांचे पाहुणे आहेत. त्यांना थेट विरोध होणार नसल्याने त्यांच्या नावावर एकमत झाल्याचे समजते.
दोन दिवसांत राजीनामा शक्य
‘गोकुळ’शी संलग्न स्थानिक नेत्यांमधील एकजूट पाहता, अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिला नाहीतर अविश्वास ठराव येणार हे निश्चित आहे. एकूण वातावरण बघता, दोन दिवसांत डोंगळे यांचा राजीनामा होण्याची दाट शक्यता आहे.
चौगलेंना पुन्हा संधी?
सतेज पाटील यांनी आपल्या समर्थक संचालकांना पाच वर्षेच संधी म्हणून सांगितले हाेते. मात्र, बाबासाहेब चौगले यांची अध्यक्षपदाची संधी हुकणार असल्याने त्यांना आणखी टर्म देऊन त्यामध्ये अध्यक्ष केले जाऊ शकते.