Kolhapur: शाहू मिल खासगी मालकाकडे न देता राज्य सरकारनेच सुरू करावी, शाहू प्रेमींच्या बैठकीत मागणीचा ठराव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 18:58 IST2026-03-17T18:57:54+5:302026-03-17T18:58:11+5:30

समिती स्थापन करणार

Shahu Mill should be started by the state government instead of being handed over to a private owner, demand resolution in Shahu lovers' meeting | Kolhapur: शाहू मिल खासगी मालकाकडे न देता राज्य सरकारनेच सुरू करावी, शाहू प्रेमींच्या बैठकीत मागणीचा ठराव 

Kolhapur: शाहू मिल खासगी मालकाकडे न देता राज्य सरकारनेच सुरू करावी, शाहू प्रेमींच्या बैठकीत मागणीचा ठराव 

कोल्हापूर : शाहू मिलची जागा खासगी मालकाकडे न देता त्या जागेवर सरकारनेच लवकरात लवकर शाहू मिल सुरू करावी, अशा मागणीचा ठराव सोमवारी खासदार शाहू छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत करण्यात आला. जर सरकार या मागणीचा विचार करणार नसेल तर त्यासाठी जनतेतून आंदोलन उभे केले जाईल, असा संकल्पही यावेळी करण्यात आला.

राजर्षी शाहू छत्रपतींनी स्थापन केलेल्या मिलचे पुनरुज्जीवन करण्यात यावे, अशी मागणी शाहूप्रेमी जनतेतून केली जाऊ लागली आहे. यापूर्वी न्यू पॅलेस, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या. आता राज्य सरकारने निर्णय घ्यायचा आहे, त्यासाठी सरकारवर सामाजिक दबाव टाकण्यासाठी ही बैठक झाली.

छत्रपती शाहू महाराजांचे खरे स्मारक व्हायचे असेल तर ते शाहू मिल सुरू करण्यातूनच होणार आहे. म्हणूनच सरकारने यात पुढाकार घेऊन स्वत: मिल सुरू करावी, असा आग्रह अनेकांनी धरला. कोल्हापूरला सहजासहजी काही मिळत नाही, तेव्हा वेळप्रसंगी जनतेतून आंदोलन उभे करावे लागले तर करावे, संघर्ष करावा आणि त्याचे नेतृत्व खासदार शाहू छत्रपती यांनी करावे, असेही यावेळी अनेकांनी सुचविले.

मिल उभारणीच्या संदर्भात खासदार शाहू छत्रपती जो आदेश देतील तो मान्य करून पुढचा लढा उभा करण्यात येईल, असे बैठकीत ठरले. सरकार आणि शाहूप्रेमी जनता यांच्यात संवाद साधण्याचे, तसेच मिल सुरू करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील ते शाहू छत्रपती यांनी करावे, असे यावेळी सुचविण्यात आले.

विजय देवणे, बाबा इंदूलकर यांनी मिल सुरू करण्यासंदर्भातील आतापर्यंतच्या घटनांचा आढावा घेतला. आर. के. पाेवार यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून एक बैठक आयोजित करावी, असे सुचविले. यावेळी संभाजी जगदाळे, दिलीप देसाई, शिवाजी परुळेकर, शेखर कवाळे, सतीशचंद्र कांबळे, बाबासाहेब देवकर, फिरोज उस्ताद, दिलीपराव पवार, शिवाजी कवाळे, शुभम शिरहट्टी, अनिल कदम, रवींद्र जाधव, काका पाटील, संजय शेटे, सुभाष देसाई, दगडू भास्कर, सनी कवाळे, संदीप देसाई, बाबा पार्टे यांनी विविध सूचना केल्या.

जनतेचा रेटा वाढवू : शाहू छत्रपती

शाहू मिल सरकारनेच सुरू करावी. मिल सुरू होणे हेच छत्रपती शाहू महाराज यांचे जिवंत स्मारक असेल. यापूर्वी जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्याबरोबर बैठका झाल्या, पण त्यांनी स्पष्ट काही सांगितलेले नाही. वस्त्रोगद्योगमंत्री यांनीही बैठक घेतली, परंतु, मिल सुरू करण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच मागणी घेऊन गेले पाहिजे. त्यांनीही काही केले नाही तर मात्र जनतेतून रेटा वाढविला पाहिजे, असे शाहू छत्रपती यांनी सांगितले

समिती स्थापन करणार

शाहू मिल सुरू करण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत आपला लढा सुरूच ठेवावा लागणार आहे. त्याकरिता समिती नेमण्यात येईल. ही समिती वेळोवेळी पुढील दिशा ठरवून त्याप्रमाणे पुढे जाण्याचा निर्णय यावेळी घेतला गेला.

Web Title : शाहू मिल: सरकार शुरू करे, कोल्हापुर बैठक में मांग।

Web Summary : कोल्हापुर के निवासियों की मांग है कि सरकार निजीकरण के बजाय शाहू मिल को फिर से शुरू करे। एक प्रस्ताव पारित किया गया, जिसमें अनदेखी करने पर सार्वजनिक आंदोलन की धमकी दी गई। बैठक में मिल के महत्व पर जोर दिया गया, सरकारी कार्रवाई का आग्रह किया गया और भविष्य की कार्रवाई के लिए एक समिति का गठन किया गया।

Web Title : Shahu Mill: Government should start it, demand in Kolhapur meeting.

Web Summary : Kolhapur residents demand the government restart Shahu Mill instead of privatizing. A resolution passed, threatening public agitation if ignored. The meeting stressed the mill's importance as a memorial, urging government action and forming a committee for future actions.