Kolhapur: चिमुकलीला वाचविण्याची बापाची शर्थ अखेर व्यर्थ, दुर्मीळ आजाराने ओवी'ची एक्झिट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 13:29 IST2025-05-26T13:28:53+5:302025-05-26T13:29:16+5:30
थेट थायलंडला जाऊन महागडे औषध आणले, हातकणंगले येथील गुरव कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

Kolhapur: चिमुकलीला वाचविण्याची बापाची शर्थ अखेर व्यर्थ, दुर्मीळ आजाराने ओवी'ची एक्झिट
कोल्हापूर : दुर्मीळ एसएसपीई (सबक्यूट स्क्लेरोसिंग पॅनेसेफलायटीस) या आजाराने गाठलेल्या सात वर्षीय ओवीला वाचविण्याची तिच्या वडिलांची शर्थ अखेर व्यर्थ ठरली. वडील सागर पुजारी यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. थेट थायलंडला जाऊन महागडे औषध आणले. कोल्हापूरकरांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ओवीला वाचविण्यासाठी मदतीचा हात दिला. मात्र, आजार बळावल्याने रविवारी (दि. २५) दुपारी ओवीने खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आणि मुलीला वाचविण्याची धडपड करणाऱ्या गुरव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
हातकणंगले येथील गुरव कुटुंबातील चैतन्याचा झरा असलेली ओवी संपूर्ण कुटुंबाची लाडकी होती. सहा महिन्यांपूर्वी फिट आल्याने वडिलांनी तिच्यावर गावातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. पुन्हा-पुन्हा हा त्रास होत असल्याने त्यांनी मुलीला कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून अनेक तपासण्या केल्या. त्यानंतर ओवीला दुर्मीळ एसएसपीई विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
या आजारावर जगात कोणतेच ठोस औषध उपलब्ध नसल्यामुळे वडील हतबल झाले. परंतु, त्यांनी जिद्द सोडली नाही. डॉक्टरांच्या मदतीने गुगलवर शोध घेऊन आजार आणि उपचाराची माहिती घेतली. चीनमधील एक औषध थायलंडमध्ये उपलब्ध असल्याचे समजताच त्यांनी थेट थायलंड गाठले. महागडे औषध आणून त्यांनी मुलीवर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू ठेवले.
पण, नियतीचा फेरा एवढ्यावरच थांबणारा नव्हता. उपचारासाठी पैशांची तजविज करणेही तितकेच महत्त्वाचे होते. यासाठी त्यांनी दानशूर कोल्हापूरकरांना साद घातली. त्यातून सुमारे लाखाची मदत जमा झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोलाची मदत केली. पण, हसत्या-खेळत्या ओवीचा जीव वाचू शकला नाही. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांचीही मदत
जयसिंगपूर दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर ओवीच्या आजाराची वार्ता पोहोचली. त्यांनी दहा लाखांची मदत केली. या मदतीमुळे ओवीचा जीव वाचेल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र, कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी अचानक ओवीची तब्येत बिघडली आणि तिने अखेरचा श्वास घेतला.