Kolhapur Crime: तोतया पोलिसांकडून सात तोळे दागिने लंपास, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 12:17 IST2025-04-08T12:15:24+5:302025-04-08T12:17:09+5:30
मार्केट यार्ड, पारगावातील घटना, पेठ वडगावातही प्रयत्न

Kolhapur Crime: तोतया पोलिसांकडून सात तोळे दागिने लंपास, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने शोध सुरु
कोल्हापूर/पारगाव : दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गुप्तहेर खात्यातील पोलिस असल्याची बतावणी करून कोल्हापुरातील राजर्षी शाहू मार्केट यार्डजवळ आणि हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव येथून दोघांकडील सात तोळे दागिने लंपास केले. या दोन्ही घटना सोमवारी (दि. ७) सकाळी दहा ते दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडल्या. याबाबत शाहूपुरी आणि पेठ वडगाव पोलिस ठाण्यात फिर्यादी दाखल झाल्या असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने भामट्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
कापड व्यापारी चंद्रप्रकाश उगमराज मांडोत (वय ६१, रा. टाकाळा चौक, कोल्हापूर) हे सोमवारी सकाळी राजर्षी शाहू मार्केट यार्डात निघाले होते. कमानीजवळ काही अंतरावर त्यांना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवले. ‘आम्ही पोलिस आहे. इथे लूटमारीचे प्रकार घडतात. तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा,’ असे सांगून त्यांना गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चेन आणि एक तोळ्याची अंगठी काढण्यास सांगितले. हातचलाखी करून दगड बांधलेली कागदाची पुडी मांडोत यांना देऊन दागिन्यांची पुडी घेऊन ते निघून गेले. काही वेळाने कागदाची पुडी सोडून पाहिल्यानंतर मांडोत यांना फसवणुकीचा प्रकार लक्षात आला. याबाबत त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पारगावात चार तोळ्यांवर डल्ला
नवे पारगाव येथील महादेव गणपती पवार (वय ६६) हे वारणानगर येथील एका खासगी कंपनीत काम करून घरी निघाले होते. सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पाडळी रोड येथील झेंडा चौकात त्यांना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवले. “आम्ही सीआयडीचे पोलिस आहे. चोरीच्या घटना घडू नयेत म्हणून आम्ही खबरदारी घेत असतो. तुम्ही अंगावर एवढे सोने घालून कशाला फिरता?” असे म्हणत त्यांनी अंगावरील सोने काढून रुमालात बांधण्यास सांगितले.
दुचाकीच्या सीटवर रुमाल ठेवून पवार यांनी तीन तोळ्यांचा गोफ आणि एक तोळ्याची अंगठी रुमालात ठेवली. दोन्ही भामट्यांनी पवार यांना बोलण्यात गुंतवून रुमालात दुसरी कागदी पुडी ठेवून दागिने काढून घेतले. घरात गेल्यानंतर त्यांना रुमालातील पुडीत बनावट दागिने असल्याचे दिसले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पेठ वडगाव पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. दरम्यान, पेठ वडगाव येथेही पोलिस असल्याची बतावणी करून लूट करण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन्ही घटनांमध्ये एकच दुचाकी
मार्केट यार्ड आणि नवे पारगाव येथील दोन्ही घटनांमध्ये काळ्या रंगाची दुचाकी दिसत आहे. दोन्ही संशयित अंदाजे २२ ते २५ वयोगटातील आहेत. दुचाकी चालवणाऱ्याने हेल्मेट घातले होते. त्याच्या अंगात निळ्या रंगाचा शर्ट आणि पँट होती. मागे बसलेल्या तरुणाच्या डोक्यावर राखाडी रंगाची टोपी होती. त्याच्या अंगात पिवळ्या रंगाचा शर्ट आणि पँट होती, अशी माहिती फिर्यादींनी दिली.