एन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 01:06 IST2021-05-18T00:59:31+5:302021-05-18T01:06:41+5:30
Senior leader N D Patil : काही दिवसांपूर्वी प्रा. पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह (Covid 19) आल्यानंतर त्यांनी त्यावर उपचार घेतले.

एन डी सरांची प्रकृती उत्तम; 92 व्या वर्षी कोरोनाला हरविले
कोल्हापूर : जेष्ठ लढाऊ नेते प्रा एन. डी. पाटील यांची प्रकृती उत्तम असून ते दूध पिऊन झोपले असल्याची माहिती त्यांच्या पत्नी सरोज उर्फ माई पाटील यांनी सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजता 'लोकमत'ला दिली. प्रा. पाटील हे कोरोनाला हरवून रविवारी रुग्णालयातून घरी आले आहेत. त्यांच्या लग्नाचा सोमवारी हिरकमहोत्सवी वाढदिवस होता. रात्री आठ वाजता नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी दूध घेतले आणि झोपी गेले. (Senior leader N D Patil defeated corona at the age of 92 year, but...)
अचानक रात्री बाराच्या सुमारास त्यांच्या प्रकृतीबद्धलची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर लगेच एका वृत्तवाहिनीने ब्रेकिंग न्यूजही दिली. जी पोस्ट व्हायरल झाली, तिचा आधार घेऊन ही ब्रेकिंग न्यूज देण्यात आली. त्याबद्धल सरोज पाटील यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना ही बातमी ऐकून जबर धक्का बसला. ही अत्यंत चुकीची बातमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तोपर्यंत संबंधित वृत्तवाहिनीने एन डी सर कोरोनाला हरवून घरी आल्याचे वृत्त दिले आणि या खोट्या बातमीवर पडदा पडला. पण या घटनेमुळे पाटील कुटुंबीयांना प्रचंड मनस्ताप झाला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रा. पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह (Covid 19) आल्यानंतर त्यांनी त्यावर उपचार घेतले. त्यानंतर कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रविवारी डिस्चार्ज मिळाला. सध्या त्यांची प्रकृती चांगली असून त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नाही आहेत.