अकॅडमींच्या आक्रमणांमुळे माध्यमिक शाळांची तपासणी; कोल्हापुरातील एका शाळेला नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 12:34 IST2025-07-30T12:30:34+5:302025-07-30T12:34:07+5:30
आतापर्यंत जिल्ह्यातील ३२ शाळांची तपासणी झाली

अकॅडमींच्या आक्रमणांमुळे माध्यमिक शाळांची तपासणी; कोल्हापुरातील एका शाळेला नोटीस
कोल्हापूर : जिल्ह्यात अकॅडमीची संख्या भरमसाठ पद्धतीने वाढत असल्याने आता माध्यमिक शाळांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी ५० टक्क्यांहून विद्यार्थी कोणत्याही सबळ कारणाशिवाय गैरहजर आहेत, अशा शाळांना नोटिसा काढण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ३२ शाळांची तपासणी झाली आहे. यातील शहरातील प्रतिभानगर येथील क्रांतिज्याेती हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना नोटीस काढण्यात आली आहे.
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने गतवर्षीपासून माध्यमिक शाळेत नाव आणि शिक्षण अकॅडमीमध्ये असा प्रकार सुरू असल्याबाबत तक्रार करण्यात आली होती. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून अचानक माध्यमिक शाळांची तपासणी करण्यात येत आहे. यातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी गैरहजर आहेत त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली. योग्य कारण वाटले नसल्यास नोटीस काढण्यात आली आहे.
प्रतिभानगरमधील वरील शाळेत मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे वार्षिक नियोजन नाही, दैनंदिन नियोजन नाही, एकाही वर्गात वेळापत्रक नाही, प्रयोगशाळा आणि ग्रंथालयाची दुरवस्था झाली आहे. शाळा खोल्या अस्वच्छ आहेत आणि ५० टक्के मुले गैरहजर यामुळे या शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस काढण्यात आली आहे.
पन्हाळा तालाक्यातील पणोरे येथील एका अकॅडमीलाही एक लाख रुपयांच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली असून ती त्यांनी लागू करून घेतलेली नाही. तसा अहवाल माध्यमिक शिक्षण कार्यालयाला प्राप्त झाला आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उपशिक्षणाधिकारी आर. जी. चौगुले, विस्तार अधिकारी डी.ए. पाटील, जयश्री जाधव यांनी वरील ३२ शाळांची तपासणी पूर्ण केली असून जिल्ह्यातील सर्व शाळांना भेटी देण्यात येणार आहेत.