कोल्हापूर महापालिका निवडणूक: जागा वाटप, महापौरपदावरुन भाजप-शिंदेसेनेमध्ये खेचाखेची
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:55 IST2025-08-11T15:53:36+5:302025-08-11T15:55:48+5:30
आखाडा तापण्यास सुरुवात, संघर्ष वाढण्याचे संकेत

कोल्हापूर महापालिका निवडणूक: जागा वाटप, महापौरपदावरुन भाजप-शिंदेसेनेमध्ये खेचाखेची
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीची अजून तारीख जाहीर झालेली नाही, जागा वाटपावर चर्चा सुरू झालेली नाही तोपर्यंतच भाजप, शिंदेसेना यांच्याकडून कोणी किती जागा घ्यायच्या, महापौर कोणाचा करायचा यावरून रणधुमाळी सुरू झाली आहे. एकीकडे महायुती म्हणून निवडणूक लढणार असा दावा केला जात असताना दुसरीकडे जागा वाटप आणि महापौरपद यावरून भांडत राहिल्याने पुढील काळात महायुतीत सौहार्द आणि विश्वासाचे वातावरण कितपत राहिल, याबाबत प्रश्नचिन्ह तयार होत आहे.
कोल्हापूरसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत. त्याची जोरदार तयारी महायुती आणि महाविकास आघाडीमार्फत सुरू आहे. कोल्हापुरातही महायुती तसेच महाविकास आघाडीचे स्थानिक नेते कामाला लागले आहे. निवडून येणाऱ्या उमेदवारांची यादी तयार केली जात आहे. अजूनही ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असणाऱ्यांची खेचाखेची सुरूच आहे.
विशेषत: ही चढाओढ शिंदेसेनेत अधिक दिसते. एका वेळी २२ माजी नगरसेवकांनी मुंबईत शिंदेसेनेत प्रवेश केला, अजूनही बरेच पक्षप्रवेश होणार आहेत. भाजपमध्येही राष्ट्रवादी अजित पवार गट व ताराराणी आघाडीच्या माजी नगरसेवकांना घेतले जात आहे. या चढाओढीमुळे शिंदे सेना व भाजप यांच्यात हळूहळू तणावाचे वातावरण तयार होऊ लागले आहे.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्वप्रथम महापौर भाजपचा होईल, असे सांगत वादाला सुरवात केली. दोन दिवसापूर्वी भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी महापालिकेच्या ४५ जागा आम्ही लढविणार आणि महापौर भाजपचाच करणार, असा दावा केला.
गतवेळी भाजप १४ आणि ताराराणी आघाडी १९ जागा अशा ३३ जागा जिंकल्या होत्या. या ३३ जागांवर महाडिक यांनी दावा केला आहेच, शिवाय काँग्रेसने जिंकलेल्या १२ जागांवरदेखील दावा केला आहे. त्याची प्रतिक्रिया शिंदेसेनेकडून लगेचच उमटली. शिवसेनेचे नेते, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महापौर शिंदेसेनेचा होईल, असे सांगून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
महायुतीत अद्याप कोणत्याही चर्चेला सुरवात झाली नसताना जाहीर कार्यक्रमात एकमेकांना शड्डू ठोकत या दावेदारांनी महायुतीत जागा आणि महापौरपद यावरून शीतयुद्ध सुरू झाल्याची जाहीर कबुली देऊन टाकली आहे. ज्या पक्षाकडे राज्याची, देशाची सत्ता असते त्यांच्याकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या जास्त असते, महापौरपदावर जास्त हक्क दाखविला जातो, हा गेल्या अनेक वर्षांचा अनुभव यंदाच्या निवडणुकीतही येत आहे. त्याची सुरवात भाजप व शिंदेसेनेत झाली आहे.
ज्यांच्याकडे संख्या जास्त त्यांचा महापौर
दोन व दोनापेक्षा जास्त पक्ष जेव्हा एकत्र येऊन निवडणूक लढवितात, तेव्हा ज्यांच्याकडे संख्या जास्त त्यांचा महापौर व्हावा अशी सर्वांची अपेक्षा असते. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपली नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु ही स्पर्धा महाविकास आघाडीबरोबर करायची सोडून महायुतीतील दोन पक्ष करत असल्यामुळे तेढ वाढविण्याकडे वाटचाल सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.