आयटी कंपन्यांसाठी कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावर जागेचा शोध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 17:19 IST2025-08-28T17:18:38+5:302025-08-28T17:19:02+5:30

जागा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले

Search for space on Kolhapur to Ratnagiri highway for IT companies | आयटी कंपन्यांसाठी कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावर जागेचा शोध 

आयटी कंपन्यांसाठी कोल्हापूर ते रत्नागिरी महामार्गावर जागेचा शोध 

कोल्हापूर : पुणे-बंगळुरू या दोन आयटी हब शहरांच्या मध्ये असलेल्या कोल्हापुरात गेल्या एक तपाहून अधिक काळ ३५० हून अधिक आयटी कंपन्यांची मुहूर्तमेढ रोवली आहे. याच कंपन्यांमधून वर्षाला ३०० कोटींहून अधिक सॉफ्टवेअरची निर्यात होत असल्याने कोल्हापूर हे आयटीसाठी किती सक्षम आहे याचा प्रत्यय जगभरातील कंपन्यांना आला आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी कोल्हापुरात यायची तयारी दर्शविली असून, त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. शेंडा पार्कातील आयटी पार्कसाठी राखीव जागा वगळून आता कोल्हापूर-रत्नागिरी या महामार्गालगत आयटी कंपन्यांसाठी प्रशासनाकडून जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे.

कोल्हापूर शहरात सध्या ३५० हून अधिक आयटी कंपन्या कार्यरत आहेत. यामध्ये हजारो जणांना रोजगार मिळाला आहे. कोल्हापूर व आसपासच्या जिल्ह्यांमधील हजारो तरुण पुणे, बंगळुरू, मुंबई, हैदराबाद या शहरांमध्ये आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. कोल्हापुरात आयटीसंबंधित मोठ्या कंपन्या नसल्याने या तरुणांना नाेकरीसाठी दूरच्या शहरात जाण्याची वेळ आल्याने कोल्हापुरात आयटी पार्क निर्माण करण्याची मागणी गेल्या एक तपापासून होत आहे. 

यासाठी अनेक ठिकाणी जागांचा शोध घेतल्यानंतर शेंडा पार्कातील कृषी विभागाची ३० एकर जागा आयटी पार्कला देण्याचा निर्णय २०२४ मध्ये घेण्यात आला. सध्या कृषी, महसूल व उद्योग विभाग यांच्यात याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कोल्हापुरातील कार्यरत कंपन्यांच्या विस्तारीकरणासाठीच ही जागा अपुरी पडणार आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या मोठ्या कंपन्यांना जागा कुठून द्यायची, असा प्रश्न असल्याने उद्योग विभागाने कोल्हापूर-रत्नागिरी या महामार्गालगत आयटी कंपन्यांसाठी जागा पाहण्यास सुरुवात केली आहे.

आयटीमधील नामांकित कंपन्या कोल्हापुरात येत असतील तर त्यांना जागाही मोठी लागेल. प्रशासनाने त्यांना आवश्यक जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कोल्हापुरातील सध्या कार्यरत आयटी कंपन्याच विस्तारीकरणाच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भविष्यात कोल्हापूर आयटी हब होणार आहे. - शांताराम सुर्वे, आयटी असोसिएशन, कोल्हापूर.

Web Title: Search for space on Kolhapur to Ratnagiri highway for IT companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.