जलयुक्त शिवारमधील खर्चाची छाननी सुरू; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा : माहिती सादर करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST2021-02-05T06:58:16+5:302021-02-05T06:58:16+5:30
कोल्हापूर : जलयुक्त शिवार योजनेच्या खर्चाची छाननी करण्यासाठी राज्य शासनानेच समिती नियुक्त केली आली असून, त्या संदर्भात सर्व माहिती ...

जलयुक्त शिवारमधील खर्चाची छाननी सुरू; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा : माहिती सादर करण्याचे आदेश
कोल्हापूर : जलयुक्त शिवार योजनेच्या खर्चाची छाननी करण्यासाठी राज्य शासनानेच समिती नियुक्त केली आली असून, त्या संदर्भात सर्व माहिती त्यांनी दिलेल्या निकषांनुसार सत्वर सादर करा, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी केली.
जलयुक्त शिवार योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, जलसंधारण अधिकारी, वनखाते व जलसंधारण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जलयुक्त शिवार योजनेच्या कामाबाबत विविध जिल्ह्यांतून वारंवार तक्रारी गेल्याने कामावर झालेल्या खर्चाची चौकशी करण्यासाठी शासनाने एक छाननी समिती स्थापन केली आहे. याअंतर्गत सर्व जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्यात झालेल्या खर्चाची माहिती देण्यात यावी, असे पत्र पाठवण्यात आले आहे. या समितीकडून २०१५ ते २०१९ या कालावधीत झालेल्या खर्चाची छाननी केली जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात बहुतांश बागायती शेती असल्याने जलयुक्त शिवार योजनेवर कमी खर्च झाला आहे. तरीही हा खर्च समितीला कशा पद्धतीने सादर करायचा आहे, याबद्दलची माहिती या बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात आली.
---