Kolhapur: पोहताना दम लागला, काठावर येत उलट्या करून निपचित पडला; मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:05 IST2025-04-11T13:04:18+5:302025-04-11T13:05:48+5:30
दिंडनेर्ली : येथील शाळकरी विद्यार्थ्याचा पोहताना दम लागून मृत्यू झाला. आयुष अनिल शेटे (वय १३) असे त्याचे नाव आहे. ...

Kolhapur: पोहताना दम लागला, काठावर येत उलट्या करून निपचित पडला; मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, पण..
दिंडनेर्ली : येथील शाळकरी विद्यार्थ्याचा पोहताना दम लागून मृत्यू झाला. आयुष अनिल शेटे (वय १३) असे त्याचे नाव आहे. काल, गुरुवारी ही घटना घडली.
घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, आयुष हा नेहमीप्रमाणे वाण्याचे शेत परिसरात असलेल्या चुलत्याच्या विहिरीत मित्रांसोबत पोहायला गेला होता. पोहत असताना नाका तोंडात पाणी जाऊन त्याला दम लागला. तशा परिस्थितीतही काठावर येऊन उलट्या करून त्याच ठिकाणी निपचित पडला.
सोबत असणाऱ्या मित्रांनी पोटातील पाणी काढून श्वास देण्याचा प्रयत्न केला. त्याची हालचाल होत नसल्याचे लक्षात येताच तत्काळ गाडीवरून त्याला गावात आणले. उपचारासाठी रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
आयुष हा गावातील ईश्वरा वाडकर हायस्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकत होता. शांत व मनमिळाऊ स्वभावाच्या आयुषच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. आयुषचा मृतदेह पाहून त्याच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, आजी, चुलते, चुलती, चुलतभाऊ असा परिवार आहे.