Kolhapur: गडहिंग्लज साखर कारखान्यात ३० कोटींचा घोटाळा, माजी अध्यक्ष प्रकाश शहापूरकरांसह २१ जणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 13:14 IST2024-12-14T13:13:58+5:302024-12-14T13:14:27+5:30
इतिहासातील पहिली कारवाई

Kolhapur: गडहिंग्लज साखर कारखान्यात ३० कोटींचा घोटाळा, माजी अध्यक्ष प्रकाश शहापूरकरांसह २१ जणांविरुद्ध गुन्हा
गडहिंग्लज : हरळी येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यात सुमारे ३० कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याचे लेखापरीक्षणातून निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश शहापूरकर, माजी कार्यकारी संचालक औदुंबर ताबे, सुधीर पाटील व महावीर घोडके यांच्यासह माजी सचिव मानसिंग देसाई, डिस्टिलरी इन्चार्ज रणजित देसाई, मुख्य शेती अधिकारी लक्ष्मण देसाई, मुख्य लेखापाल बापूसाहेब रेडेकर, ऊसतोडणी ओढणी कंत्राटदार श्रीमंत पुजारी (नंदनवाड), राजेंद्र देसाई, अनिल भोसले, सयाजी देसाई (इंचनाळ), संतोष पाटील (भादवण), शिवाजी शिंत्रे (बेळगुंदी), बसवराज आरबोळे (तनवडी), रूपाली पाटील, महेश ताडे, विलास ताडे, यलुप्पा बोकडे, हनुमंत तोंडे, दादाराव तोंडे यांच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, २०२३-२४ मध्ये संचालक मंडळाने तत्कालीन अध्यक्ष शहापूरकर यांच्याकडे एकहाती कारभार सोपविला होता. त्यावेळी त्यांनी सहकार कायद्याचा भंग, अधिकाराचा गैरवापर करून प्रशासकीय मंजुरीशिवाय कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार केला. उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह संचालकांनी शहापूरकर यांच्या बेकायदेशीर कारभाराबाबत साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालकांकडे वेळोवेळी तक्रार केली.
दरम्यान, गोड साखर सेवानिवृत्त कामगार संघटनेतर्फे माजी संचालक शिवाजी खोत यांनीही तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार कारखान्याचे चाचणी लेखापरीक्षणही झाले. विशेष लेखापरीक्षक धनंजय पाटील व कारखान्याचे अंतर्गत लेखापरीक्षक सुशांत फडणीस यांच्या अहवालानुसार प्रादेशिक साखर सहसंचालकांनी संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाईचे आदेश दिले. कारखान्याचे अंतर्गत लेखापरीक्षक फडणीस यांच्या फिर्यादीवरून पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर अधिक तपास करीत आहेत.
‘लोकमत’ने वेळोवेळी उठविला आवाज..!
अधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे, ऊस बिले, कामगार पगार देण्यातील दिरंगाई, केवळ कारखान्याची मालमत्ता तारण ठेवून अहमदाबादच्या तथाकथित ट्रस्टकडून ३०० कोटींचे कर्ज बेकायदा उचलण्याचा खटाटोप याबाबत केवळ ‘लोकमत’नेच वेळोवेळी आवाज उठविला. त्यामुळे संचालक एकत्र आल्याने अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची नामुष्की शहापूरकरांवर ओढवली. आता फौजदारी कारवाईमुळे जनमाणसांतील त्यांच्या प्रतिमेलाही तडा गेला आहे.
संचालकांना का वगळले?
शहापूरकरांच्या बेकायदेशीर कारभाराबाबत अन्य संचालकांनी साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालकांकडे तसेच लेखापरीक्षणावेळी आक्षेप नोंदविले आहेत. त्यामुळे उपाध्यक्ष चव्हाण यांच्यासह सर्व संचालकांना कारखान्याच्या नुकसानीच्या जबाबदारीतून वगळल्याचे लेखापरीक्षकांनी फिर्यादीत म्हटले आहे.
इतिहासातील पहिली कारवाई
गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात कारखान्यातील आर्थिक घोटाळ्यासंदर्भात फौजदारी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तब्बल २२ वर्षांनंतर दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी मिळालेल्या शहापूरकरांची मनमानी त्यांच्या सार्वजनिक प्रतिष्ठेवरच बेतली. त्यांच्या मनमानीला कंटाळून राजीनामे दिलेल्या अधिकाऱ्यांनाही कटू कारवाईला सामोरे जावे लागले.
११ कोटी ४२ लाखांचा अपहार
- बॉयलर मॉडीफिकेशन : ४ कोटी ४६ लाख
- बेकायदा डिस्टिलरी विस्तार : २ कोटी ३८ लाख
- जुना गिअर बॉक्स खरेदी : २ कोटी २४ लाख
- टर्बाईन खरेदी : १ कोटी ३५ लाख
- तोडणी वाहतूक ॲडव्हान्स : ९८ लाख
१८ कोटी २९ लाखांचे नुकसान
कारखाना विस्तारीकरण, आधुनिकीकरण व खरेदीमध्ये अनियमितता व प्रशासकीय मंजुरीशिवाय केलेल्या आर्थिक व्यवहारामुळे १८ कोटी २९ लाखांचे नुकसान झाले आहे.
एका आरोपीचे निधन..!
संशयित आरोपींपैकी डॉ. शहापूरकर यांचे विश्वासू सहकारी आणि कारखान्याचे माजी सचिव तथा प्रभारी कार्यकारी संचालक मानसिंग देसाई यांचे गुरुवारी (दि.१२) निधन झाले आहे.
मुख्य लेखापालास कोठडी
मुख्य लेखापाल बापूसाहेब रेडेकर याला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुजित राठोड यांनी त्याला सोमवार (दि.१६) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.