सतेज पाटील काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीत, सरचिटणीसपदी कोल्हापूर जिल्ह्यातून तिघांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 15:26 IST2025-07-31T15:25:29+5:302025-07-31T15:26:04+5:30
सूर्यकांत पाटील-बुदिहाळकर, इचलकरंजीचे शशांक बावचकर आणि माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांचा समावेश

सतेज पाटील काँग्रेसच्या राजकीय व्यवहार समितीत, सरचिटणीसपदी कोल्हापूर जिल्ह्यातून तिघांना संधी
कोल्हापूर : विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांची अखिल भारतीय काँग्रेसने पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीवर नियुक्ती केली आहे.
या संदर्भातील घोषणा अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी मंगळवारी रात्री केली. आमदार पाटील गेली चार-पाच वर्षे राज्य कार्यकारी समितीतही ते काम करत आहेत. राज्याच्या राजकारणातील त्यांचा प्रभाव लक्षात घेऊन पक्षाने या दोन्ही समितीत त्यांना पुन्हा स्थान दिले आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, विजय वड्डेटीवार यांच्यानंतर पाचव्या क्रमाकांवर सतेज पाटील यांना या यादीत स्थान मिळाले आहे. ‘पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचा चेहरा’ म्हणून पक्षाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची संधीही त्यांना येत्या अधिवेशनात मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीवर सरचिटणीस म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून तिघांना संधी मिळाली. सूर्यकांत पाटील-बुदिहाळकर, इचलकरंजीचे शशांक बावचकर आणि माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांचा त्यामध्ये समावेश आहे. तिघेही काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.
बुदिहाळकर पाटील यांचे घराणेच काँग्रेसमय आहे. ते शिवाजी विद्यापीठाच्या स्टुडंट कौन्सिलपासून काँग्रेसशी जोडले गेले आहेत. त्यांनी यापूर्वी युवक काँग्रेस, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून राजीव गांधी यांच्यासोबत काम केले आहे. मुल्लाणी आता पक्षाचे प्रदेश सचिव होते. त्यांनीही छत्तीसगड, गोवा, कर्नाटक, जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत पक्ष निरीक्षक म्हणून काम केले आहे. युथ काँग्रेसपासून पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. मौलाना आझाद महामंडळाचे संचालक म्हणून पक्षाने त्यांना संधी दिली होती.
बावचकर हे गेली चार वर्षे प्रदेश सचिव होते. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सहप्रभारी व प्रभारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. सध्या ते सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा काँग्रेस निरीक्षक आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्यांनी उत्तम काम केले. सन १९८१ पासून पक्षामध्ये ते कार्यरत असून, दहा वर्षे नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.