सतेज पाटील नवीनच 'आर्किटेक्ट' झालेत, शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित खर्चावरुन मंत्री मुश्रीफांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:54 IST2025-08-12T12:53:33+5:302025-08-12T12:54:09+5:30
राष्ट्रवादी फिनिक्स पक्षासारखा.. महापौर आमचाच..

सतेज पाटील नवीनच 'आर्किटेक्ट' झालेत, शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित खर्चावरुन मंत्री मुश्रीफांचा टोला
कोल्हापूर : आमदार सतेज पाटील हे नवीनच आर्किटेक्ट झालेले आहेत. त्यांचे महामार्ग उभारणीतील या विषयातील ज्ञान इतके प्रगल्भ झाले आहे, हे मला माहिती नव्हते; पण विनाकारण प्रस्तावित खर्चाचा आकडा वाढवला जात नाही. रस्ता किती किलोमीटरचा असतो, तो काँक्रिटीकरणाचा की कसा? यावर त्याचे दर ठरत असतात. मला वाटतेय, हा त्यांचा गोड गैरसमज असावा, अशी टीका मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित खर्चाचा आकडा वाढविलेला आहे अशी टीका आमदार सतेज पाटील यांनी केली होती त्यावर मुश्रीफ म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग करण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका असली तरी ते लादणार नाही. लोकप्रतिनिधींना, शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय शक्तिपीठ रस्ता होणार नाही. त्यांनी आम्हाला अनेक मार्ग सुचविलेले आहेत. त्यापैकी जो मार्ग चांगला असेल. कमीत कमी बागायती जमीन जाईल व जिथे शेतकरी समाधान असेल त्या ठिकाणाहून शक्तिपीठ महामार्ग नेला जाईल.
निवडणूक आयोगानेच मतचोरी केल्याची तक्रार राहुल गांधी करत आहेत यावर मुश्रीफ म्हणाले, पराभव पचवायचीही ताकद लागते. राहुल गांधी या मुद्द्यावरून विनाकारण निवडणूक आयोगाचा देशाचा वेळ, संसदेचाही वेळ घेता आहेत. यामधून काहीही साध्य होणार नाही.
राष्ट्रवादी फिनिक्स पक्षासारखा.. महापौर आमचाच..
महापौरपदांच्या वाटणीमध्ये भाजप- शिंदेसेनेचीच चर्चा आहे. यामध्ये राष्ट्रवादी कुठेच दिसत नाही. यावर ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अनेक निवडणुकांमध्ये आम्ही दुसऱ्या स्थानावर आलो आहोत. आम्ही महापौर, स्थायी समिती सभापती पद अशी सगळी पद घेतली आहेत. यावेळीसुद्धा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होणार असल्याचा दावा त्यांनी केला.