कोल्हापूर जिल्ह्यात सरपंच आरक्षणात अनेक गावांत उलट फेर, खुल्या ठिकाणी इच्छुक वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:15 IST2025-04-09T17:14:50+5:302025-04-09T17:15:17+5:30

गावगाड्याच्या राजकारणाला धुमारे

Sarpanch reservation in Kolhapur district has been reversed in many villages, the number of candidates seeking open positions will increase | कोल्हापूर जिल्ह्यात सरपंच आरक्षणात अनेक गावांत उलट फेर, खुल्या ठिकाणी इच्छुक वाढणार

कोल्हापूर जिल्ह्यात सरपंच आरक्षणात अनेक गावांत उलट फेर, खुल्या ठिकाणी इच्छुक वाढणार

कोल्हापूर : बाराही तालुक्यांत झालेल्या सरपंच निवडीत अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसला आहे. त्यामुळे ज्यांच्या मनासारखे आरक्षण पडले, त्यांच्या गोटात आनंद व्यक्त केला, तर ज्यांची निराशा झाली त्यांच्या गोटात पर्यायी नावांची चर्चा सुरू झाली. ज्या ठिकाणी गावपातळीवर पुढाऱ्यांना इच्छा होती, तिथे किमान सर्वसाधारण महिला आरक्षण पडल्याने तेथे त्यांच्याच पत्नीचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आतापासूनच सुरू झाली.

चंदगड तालुक्यातील कुदनूर, कालकुंद्री, कोवाड येथे ओबीसी, तर ओबीसी महिलेसाठी हाजगाेळी आरक्षित झाले आहे. तुर्केवाडी, मजरे कारवे, हेरे खुले झाले असून, धुमडेवाडी, शिवणगे, म्हाळेवाडी, हलकर्णी महिलांसाठी आरक्षित झाले आहे. भुदरगड तालुक्यात गारगोटीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाले असून, पिंपळगाव ओबीसी, कडगाव, मडिलगे खुर्द महिलांसाठी आरक्षित झाले आहे.

हातकणंगले तालुक्यात पुलाची शिरोली, रुकडी, पट्टणकोडोली हे ओबीसीसाठी राखीव झाले असून, माणगाव येथे अनुसूचित महिलेसाठी पद आरक्षित झाले आहे. अंबप, भादोले, कुंभोज खुले झाले असून, हेर्ले हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे.

शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी, शिरढोण महिला सर्वसाधारण, दानोळी सर्वसाधारण, यड्राव ओबीसी महिला, तर अब्दुललाट, आकिवाट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. कागल तालुक्यात सेनापती कापशी, म्हाकवे, बोरवडे, बाचणी या प्रमुख गावात सरपंच पद खुले झाल्याने राजकीय दृष्ट्या मोठी चुरस येथे पाहावयास मिळणार आहे, तर तालुक्यातील सर्वांत मोठ्या कसबा सांगावचे पद ओबीसी आरक्षित झाले आहे. मौजे सांगाव, नानीबाई चिखलीची पदे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहिली आहेत.

पन्हाळा तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या कोडोली आणि कोतोलीचे सरपंच पद खुले राहिले असून, कळे येथे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. शाहूवाडी तालुक्यात सरूड, बांबवडे, कापशी सरपंचपद महिलांसाठी खुले झाले असून, पेरीड, भेडसगाव, चरण, आंबा येथील पदे खुली झाली आहेत.

राधानगरी तालुक्यातील राशिवडे खुर्द, राधानगरी, शिरगाव, घोटवडे, साेळांकूर, सरवडेची सरपंचपदे ओबीसी महिलांसाठी आरक्षित असून, राशिवडे बु., कसबा वाळवे, कसबा तारळेची पदे खुली झाली आहेत.

गडहिंग्लज तालुक्यातील हसूरचंपू, हलकर्णी येथील सरपंचपद खुले झाले असून कौलगे, बटकणंगले, इंचनाळ येथे सर्वसाधारण महिला आरक्षण पडले आहे. नेसरी, नूल, कडगाव, महागाव, गिजवणे या मोठ्या गावांत ओबीसी आरक्षण असून, करंबळी, हिरलगे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित आहे.

गडमुडशिंगी, सांगरूळ खुले

करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी, सांगरूळ, गोकुळ शिरगाव येथील सरपंचपदे खुली झाल्याने या ठिकाणी राजकीय संघर्ष पाहावयास मिळणार आहे. हणमंतवाडी, उचगाव, खेबवडे, नागदेववाडी येथे अनुसूचित महिला, तर वडणगे ओबीसी आणि उजळाईवाडी ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाले आहे.

उत्तूर अनुसूचित महिलेसाठी राखीव

आजरा तालुक्यातील सर्वांत मोठ्या उत्तूर ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित महिलेसाठी राखीव झाले आहे, तर पेरणोली, बहिरेवाडीचे पद सर्वसाधारण झाल्याने या ठिकाणी निवडणूक रंगणार आहे. मडिलगे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून, शिरसंगी, वाटंगी, गजरगाव येथील पदे खुली झाली आहेत, तर भादवण ओबीसीसाठी आरक्षित झाले.

Web Title: Sarpanch reservation in Kolhapur district has been reversed in many villages, the number of candidates seeking open positions will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.