Kolhapur: मोक्का गुन्हेगार देशपांडे गांजा विकताना अटक, तीन किलो गांजा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:50 IST2025-01-02T11:50:18+5:302025-01-02T11:50:38+5:30
राजारामपुरी पोलिसांची कारवाई

Kolhapur: मोक्का गुन्हेगार देशपांडे गांजा विकताना अटक, तीन किलो गांजा जप्त
कोल्हापूर : मोक्कांतर्गत कारवाई झालेला सराईत गुन्हेगार सनत प्रताप देशपांडे (वय ३४, रा. राजारामपुरी ९ वी गल्ली, कोल्हापूर) याला राजारामपुरी पोलिसांनी गांजा विकताना अटक केले. त्याच्याकडून ७८ हजार रुपयांचा गांजा आणि मोबाइल असा सुमारे ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. ३१) रात्री पावणेबाराच्या सुमारास राजारामपुरीत ११ व्या गल्लीतील एका मेडिकलसमोर झाली.
राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सनत देशपांडे हा गांजाची विक्री करीत असल्याची माहिती पोलिस अंमलदार संदीप सावंत यांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा राजारामपुरीतील ११ व्या गल्लीत एका मेडिकलसमोर देशपांडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
अंगझडतीत त्याच्याकडे ३ किलो गांजा मिळाला. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी गांजा आणल्याची त्याने कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडील ३ किलो गांजा आणि मोबाइल जप्त केला. त्याने कोणाकडून गांजा आणला, याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने यांच्यासह सहायक फौजदार समीर शेख, हवालदार अरविंद पाटील, अंमलदार संदीप सावंत, विशाल शिरगावकर, अमोल पाटील, आदींच्या पथकाने कारवाई केली.
देशपांडे मोक्कातील आरोपी
अटकेतील सनत देशपांडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर राजारामपुरी आणि गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गांजा विक्रीसह मारामारी, दहशत माजविण्याचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली होती. गांजा विक्रीच्या गुन्ह्यात त्याच्या आणखी काही साथीदारांचा सहभाग असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.