यूएसआयतर्फे ‘इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिव्हल’साठी संभाजीराजेंना निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 18:57 IST2025-10-06T18:56:13+5:302025-10-06T18:57:53+5:30
यूएसआय ही देशातील सर्वात जुनी लष्करी थिंक-टँक संस्था

यूएसआयतर्फे ‘इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिव्हल’साठी संभाजीराजेंना निमंत्रण
कोल्हापूर : रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांना येत्या १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या ‘इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिव्हल’साठी युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्युशन ऑफ इंडिया (यूएसआय)तर्फे निमंत्रित करण्यात आले आहे.
१८७० मध्ये स्थापन झालेली यूएसआय ही देशातील सर्वात जुनी लष्करी थिंक-टँक संस्था आहे. त्यांच्या सेंटर फॉर मिलिटरी हिस्टरी अँड कॉन्फ्लिक्ट स्टडी विभागाचे संचालक स्क्वॉड्रन लीडर राणा टी. एस. चिन्ना आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. अर्चना त्यागी यांची नवी दिल्लीत संभाजीराजे छत्रपती यांनी भेट घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय लष्करी, तसेच सांस्कृतिक वारशाचे जतन आणि पुनरुत्थान करण्यासाठी रायगड विकास प्राधिकरण आणि सेंटर फॉर मिलिटरी हिस्टरी अँड कॉन्फ्लिक्ट स्टडी यांच्यात पुढील काळात संयुक्तरित्या काम करण्याबाबत चर्चा झाली.
विशेषत: दुर्गराज रायगड व परिसरातील ऐतिहासिक लष्करी वारसा व्यवस्थापन धोरण, पर्यटन विकास व शाश्वतता, जैवविविधता संरक्षण, पर्यटन अर्थशास्त्र, तसेच स्थानिक रोजगार निर्मिती अशा विविध अंगांनी दोन्ही संस्था एकत्रितरीत्या कार्य करु शकतात, याबाबत चर्चा झाली. या बैठकीला प्राधिकरणाचे तज्ज्ञ सल्लागार ए. के. सिन्हा, रामनाथन, वास्तू संवर्धक वरुण भामरे उपस्थित होते.