देवीच्या जागरसाठी आणले अन् जेवणातून गुंगींचे औषध देऊन लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 02:02 PM2021-02-03T14:02:50+5:302021-02-03T18:11:51+5:30

Crimenews Kolhapur- राचंनवाडी (ता. चाकूर, जि. लातूर) येथील डान्स ग्रुपच्या नऊ कलाकारांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन त्यांचे सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे. बिंदू चौकातील गंजी गल्लीतील एका यात्रीनिवास मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन असणाऱ्या गुंगीत असणाऱ्या पाच महिला व चार पुरुष अशा नऊ जणांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

Robbed the dance group at Latur, Pobara with gold ornaments | देवीच्या जागरसाठी आणले अन् जेवणातून गुंगींचे औषध देऊन लुटले

देवीच्या जागरसाठी आणले अन् जेवणातून गुंगींचे औषध देऊन लुटले

Next
ठळक मुद्देलातूर जिल्ह्यातील नऊ कलाकारांना जेवणातून गुंगीचे औषध कोल्हापुरात यात्री निवासमध्ये प्रकार ; लुटारूने सोन्याचे दागिने, रोकड केली लंपास

कोल्हापूर : देवीचा जागर (आराधी) करण्यासाठी कोल्हापुरात बोलविलेल्या लातूर जिल्ह्यातील राचन्नावाडी (ता. चाकूर) येथील कलाकारांना जेवणातून गुंगीचे औषध देऊन लुटण्याचा प्रकार घडला. बेशुद्ध होऊन निपचीत पडलेल्या महिला व पुरुषांच्या अंगावरील लाखो रुपये किमतीचे दागिने व रोकड घेऊन लुटारूने पोबारा केला.

बिंदू चौकानजीक गंजी गल्लीतील एका यात्रीनिवासमध्ये हा प्रकार बुधवारी दुपारी बारा वाजता उघडकीस आला. बेशुद्धावस्थेतील व काही गुंगीतील नऊजणांना पोलिसांनी उपचारासाठी सीपीआर रुग़्णालयात दाखल केले. कोल्हापुरात मध्यवस्तीत यात्री निवासमध्ये अशा पद्धतीने लुटण्याचा प्रकार प्रथमच घडल्याने खळबळ माजली.

उपचार घेत असलेले पुढीलप्रमाणे : सखुबाई पिराजी सूर्यवंशी (वय ४०), द्रुपदा मल्हारी सूर्यवंशी (५०), कमलाबाई महादेव कांबळे (५५), कुमाबाई रामकिशन कौर (४०), ताईबाई मल्हारी सूर्यवंशी (४५), मसनाजी पांडुरंग चिंचोळे (२४), रामकिशन सीताराम कौर (४८), अशोक अंकुश भरळे (५५), मल्हारी गणपती सूर्यवंशी (४२, सर्व रा. राचन्नावाडी, ता. चाकूर, जि. लातूर).

राचन्नावाडी येथील देवीचा जागर (आराधी) करणाऱ्या ग्रामीण कलाकारांच्या नऊजणांच्या ग्रुपला कोल्हापुरात अंबाबाई देवीची गाणी म्हणण्याच्या कार्यक्रमासाठी एका व्यक्तीने फोनवरच नियोजन करून पाचारण केले. त्यांना १४ हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार पाच महिला व चार पुरुष असे झांज, ढोलकी साहित्य घेऊन एस.टी. बसने मंगळवारी मध्यरात्री कोल्हापुरात आले. त्यांना मध्यवर्ती बसस्थानक परिसरात संबंधित व्यक्तीने गाठले. तेथून सर्वांना रिक्षाने गंजी गल्लीतील यात्रीनिवासातील रूममध्ये ठेवले.

लुटारूने येतानाच त्यांच्यासाठी जेवण आणले. रात्रीच्यावेळी सर्व जेवले, त्यानंतर काही वेळातच सर्वांना चक्कर येऊन बेशुद्ध पडले. त्यानंतर लुटारूने महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व बॅगमधील रोकड घेऊन पहाटे पलायन केले.

सकाळी नऊ वाजता यात्री निवासचा कामगार त्यांना चेकआऊटसाठी आला; पण दरवाजाला कुलूप दिसले. भाविक अंबाबाई दर्शनासाठी गेले असावेत असे त्याला वाटले. दुपारी बाराच्या सुमारास सखुबाई सूर्यवंशी या महिलेने आतून दरवाजा ठोठावल्याने व्यवस्थापक अमर पाटील याने दुसऱ्या चावीने कुलूप काढून दरवाजा उघडला.

रूममधील दृश्य भयानकच होते. दोन महिला व एक पुरुष गुंगीत होते, तर इतर बेशुद्धावस्थेत निपचीत पडले होते. त्याने मालक उत्तम पाटील (रा. साळोखेनगर) यांना याची माहिती कळवली. पोलीस घटनास्थळी आले, त्यावेळी लुटीचा प्रकार उघड झाला. सर्वांना सीपीआरमध्ये दाखल केले. दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.

मोबाईल फोडला, इतर पाण्यात बुडविले

कार्यक्रमासाठी लुटारूने संबंधित कलाकारांना ज्या फोनवर फोन केले, तो मोबाईल फोडला, तर इतर मोबाईल हे पाण्याच्या बादलीत बुडवून ठेवले. तसेच ती बादली बाथरूममध्ये पोलिसांना मिळाली.

सीसी फुटेजमध्ये लुटारू कैद

संबंधित लुटारू हा ४० वयोगटातील असून, त्याने मंगळवारी सायंकाळीच यात्रीनिवासमध्ये रूम बुकबाबत चौकशी केली. तो रात्री १२ वाजता सर्वांना घेऊन आला. त्याने सखुबाई सूर्यवंशी नावाने रूम ताब्यात घेतली, त्यांचे आधारकार्डही ठेवून घेतले. लुटारूने आपला डाव आटोपता घेऊन पहाटे दाराला बाहेरून कुलूप घालून पोबारा केला. लुटारूची हालचाल यात्री निवासमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली, ते फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: Robbed the dance group at Latur, Pobara with gold ornaments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.