Kolhapur: भीती घालून मागितली २० लाखांची खंडणी, माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीसह दोघांना १५ लाख घेताना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:03 IST2025-06-25T18:03:22+5:302025-06-25T18:03:31+5:30
दोन वर्षांत चार हजार अर्ज

Kolhapur: भीती घालून मागितली २० लाखांची खंडणी, माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळीसह दोघांना १५ लाख घेताना पकडले
कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये (सीपीआर) बनावट कागदपत्रांच्या आधारे औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी तक्रारी करण्याची भीती घालून २० लाखांची खंडणी मागणाऱ्या आणि तडजोडीअंती १५ लाख स्वीकारणाऱ्या माहिती अधिकार महासंघाच्या जिल्हाध्यक्षासह दोघांना पोलिसांनी अटक केली.
जयराज भीमराव कोळी (वय ४२, कोल्हापूर) आणि मध्यस्थ युवराज मारुती खराडे (४८, उचगाव), अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. २३) रात्री उशिरा कागल पंचतारांकित एमआयडीसीत सापळा रचून कारवाई केली.
अजिंक्य पाटील हा शासकीय रुग्णालयांना वैद्यकीय उपकरणे आणि औषधांचा पुरवठा करतो. बनावट कागदपत्रांच्या आधारे काही औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याची पत्नी डॉक्टर असून, त्या सीपीआरमध्ये कार्यरत होत्या. माहिती अधिकार कार्यकर्ता जयराज कोळी हा या दाम्पत्याबद्दल वारंवार तक्रारी करीत होता. त्याने माहिती अधिकारात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अर्ज केले होते.
असे अर्ज न करण्यासाठी त्याने मध्यस्थ युवराज खराडे याच्यामार्फत अजिंक्य पाटील याच्याकडे २० लाखांच्या खंडणीची मागणी केली. तडजोडीअंती १५ लाख रुपये देण्याचे ठरले. खंडणी देण्यापूर्वी पाटील याने पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्याकडे तक्रार केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कोळी आणि खराडे या दोघांना पैसे स्वीकारताना अटक केली. खंडणीसाठी दिलेले ३० हजार रुपये, गुन्ह्यात वापरलेली कार आणि तीन मोबाइल असा ५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
दोन वर्षांत चार हजार अर्ज
कोळी याने गेल्या दोन वर्षांत विविध शासकीय कार्यालयांमध्ये माहिती अधिकारात तब्बल चार हजार अर्ज केले आहेत. अनेक अधिकाऱ्यांना त्याने अर्ज करून हैराण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.