कोल्हापुरातील आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातरोप लागण, शेतकऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 18:32 IST2026-03-28T18:31:50+5:302026-03-28T18:32:05+5:30
शेतकरी विकास मंडळाने दिली मशिनरीची ऑर्डर

कोल्हापुरातील आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातरोप लागण, शेतकऱ्यांना दिले जाणार प्रशिक्षण
आजरा : आजरा तालुक्यातील १ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताचे तरवा पेरणी व रोप लागण यांत्रिकी पद्धतीने केली जाणार आहे. आजरा तालुका शेतकरी विकास मंडळाने ७ गावांना ७ यांत्रिकी मशीनची ऑर्डर नागालँड व हरियाणा राज्यात दिली आहे. यामुळे भात रोप लागणीवेळी होणाऱ्या मजुरांच्या तुटवड्याला पर्याय उपलब्ध होणार आहे.
आजरा तालुक्यात भात पिकाला मुबलक पाऊस व अनुकूल हवामान असल्यामुळे सर्वात जास्त भाताचे उत्पादन घेतले जाते. रोजगारासाठी गावागावातून तरुणांचे लोंढे शहराकडे जात असल्यामुळे शेती करण्याकडे तरुणांचा ओढा कमी झाला आहे. मजूर घेऊन शेती करणे सध्या परवडत नाही त्यामुळे तालुक्यातील २५ टक्के क्षेत्र ओसाड पडले आहे.
शेतीसाठी मजुरांचा असणारा तुटवडा लक्षात घेऊन आजरा शेतकरी विकास मंडळाने भाताचे तरवा पेरणी मशीन चेन्नई येथून तर भात लागण मशीन नागालँड व हरियाणा येथून आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचे पैसेही भरले आहेत. पहिल्या टप्प्यात दोन्ही प्रकारची ७ मशीन आणली जाणार आहेत. या मशीनचे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
शेतकऱ्यांना प्रशिक्षण
तरवा पेरणी व भात रोप लागण मशीनची माहिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना प्रशिक्षणातून दिली जाणार आहे. भात रोपे तयार करणे, यंत्र चालवणे व हाताळणे, तरवा तयार करणे व यंत्राने पेरणी करण्याची प्रात्यक्षिके व रोप लागण मशीन चालविण्याची प्रात्यक्षिके या प्रशिक्षणात दिली जाणार आहेत. प्रत्येक गावातील १० शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाणार आहे अशी माहिती आजरा तालुका शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत यांनी दिली.
९ हजार १०० हेक्टर क्षेत्र
तालुक्यात धरणांमुळे पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे भाताचे क्षेत्र कमी होऊन उसाचे क्षेत्र वाढले आहे. तरीही ९ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेतले जाते. ५५०० हेक्टर क्षेत्रावर भात रोप लागण केली जाते. पहिल्याच वर्षी १ हजार हेक्टर क्षेत्रावर यांत्रिकी पद्धतीने भात रोप लागण केली जाणार आहे.