महसूल कर्मचारी आज रजेवर

By Admin | Updated: July 30, 2015 00:32 IST2015-07-30T00:02:00+5:302015-07-30T00:32:16+5:30

अपमान प्रकरण : निर्णयावर ठाम : जिल्हाधिकाऱ्यांनीही चर्चा करण्याचे टाळले

Revenue employees leave today | महसूल कर्मचारी आज रजेवर

महसूल कर्मचारी आज रजेवर

कोल्हापूर : वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या निषेधार्थ जिल्ह्णातील महसूल कर्मचारी सामुदायिक रजा घेण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्यामुळे आज, गुरुवारी महसूल विभागाचे काम ठप्प होण्याची शक्यता आहे. बुधवारी दिवसभर बैठकीत व्यस्त असणाऱ्या जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी कोणतीही चर्चा करण्याचे टाळल्याने या प्रकरणात दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेचा विषय केला जात असल्याचे स्पष्ट झाले.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना कोल्हापूर जिल्ह्णात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे सामुदायिक रजा आंदोलन होणे अपेक्षित नसले तरी जिल्हाधिकारी डॉ. सैनी हे चर्चेला बोलवतील म्हणून संघटनेचे पदाधिकारी बुधवारी प्रतीक्षा करीत होते. परंतु, जिल्हाधिकारी सायंकाळपर्यंत बैठकीत व्यस्त असल्याने, तसेच त्यांच्याकडून कोणताही निरोप न मिळाल्याने ते निघून गेले. त्यामुळे आज सामुदायिक रजा घेण्यावर कर्मचारी ठाम राहिले. त्याचा परिणाम महसूलच्या कामावर होणार आहे.
जिल्हाधिकारी सैनी यांच्याकडून कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याबद्दल पूर्ण महसूल विभागात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून लिपिक सुशांत पाटील यास तडकाफडकी निलंबित केल्यानेही कर्मचाऱ्यांमधील संताप उफाळून आला. त्यांनी, निलंबन तत्काळ मागे घ्यावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. तसेच आज सामुदायिक रजा घेण्याचाही इशारा दिला होता.
महसूल कर्मचाऱ्यांच्या निवेदनानुसार निवासी उपजिल्हाधिकारी संगीता चौगुले यांना मंगळवारी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. तथापि, जिल्हाधिकारी नसतील तर चर्चा करणार नाही, अशी भूमिका कर्मचारी संघटनेने घेतली. त्यामुळे बुधवारी तरी चर्चेला बोलाविले जाईल, ही अपेक्षा फोल ठरली. (प्रतिनिधी)

बैठकीत आज आंदोलनाची दिशा
आज, गुरुवार सकाळी १० वाजता जिल्ह्णातील सर्व कर्मचारी ताराराणी सभागृहाजवळ जमणार आहेत. तेथे त्यांची बैठक होणार असून, पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे, असे राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष विलासराव कुरणे यांनी सांगितले.

Web Title: Revenue employees leave today