Kolhapur: लाचखोरीत महसूल विभाग आघाडीवर; पोलिस तिसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 16:30 IST2024-12-13T16:30:31+5:302024-12-13T16:30:53+5:30

११ महिन्यांत २० कारवाया, २८ लाचखोर अडकले जाळ्यात

Revenue department at the forefront of bribery in Kolhapur, Police in third place | Kolhapur: लाचखोरीत महसूल विभाग आघाडीवर; पोलिस तिसऱ्या क्रमांकावर

Kolhapur: लाचखोरीत महसूल विभाग आघाडीवर; पोलिस तिसऱ्या क्रमांकावर

कोल्हापूर : नागरिकांच्या कामांची पूर्तता करण्यासाठी लाच घेऊन वरकमाई करण्यात महसूल आणि पोलिस विभागाची नेहमीच चढाओढ सुरू असते. यंदा महसूल विभागातील ९ जण लाच घेताना सापडले, तर अन्न व औषध प्रशासन विभागातील लाचखोरांच्या विरोधात चार गुन्हे दाखल झाले असून, चौघे जाळ्यात अडकले. लाचखोरीत नेहमी आघाडीवर असलेले पोलिस खाते मात्र यंदा तिसऱ्या क्रमांकावर आहे. इचलकरंजीत एका बँकेचा कायदेशीर सल्लागार जप्ती पुढे ढकलण्यासाठी एक लाख ७० हजारांची लाच घेताना सापडल्याने लाचखोरीचा प्रकार पुन्हा चर्चेत आला आहे.

लाचखोरीची कीड संपेना

लाच देऊन काम करून घेणे आणि शासकीय कामासाठी लाचेची मागणी करणे हा कायद्याने गुन्हा असला तरीही लाच देण्याचे आणि घेण्याचे प्रमाण दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. लाचखोरीची कीड शासकीय यंत्रणा पोखरून अवैध प्रकारांना प्रोत्साहन देत आहे. असे गैरप्रकार रोखण्यासाठी शासनस्तरावरून दरवर्षी प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात. तरीही लाचखोरीची कीड हटवण्यात यश आलेले नाही.

‘एसीबी’चे २० सापळे

गेल्या ११ महिन्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच ‘एसीबी’ने जिल्ह्यात २० सापळे रचून २८ लाचखोरांवर कारवाई केली. यातील २५ जण शासकीय सेवेतील कर्मचारी आणि अधिकारी आहेत. उर्वरित तिघे खासगी एजंट आहेत. सर्व संशयितांवर आरोपपत्र दाखल झाले असून, पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

अधिकाऱ्यांनाच लाचेचा मोह

लाच घेताना प्रत्यक्ष सापळ्यात सापडलेल्या २८ संशयितांपैकी १६ जण वर्ग तीनचे कर्मचारी आहेत. दोघे वर्ग दोनचे अधिकारी असून, वर्ग एकचा एक अधिकारी आहे. कारवाईत वर्ग एक आणि दोनच्या अधिकाऱ्यांची संख्या कमी असली तरी, वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांना पुढे करून वरिष्ठ अधिकारीच लाचेची मागणी करीत आहेत.

महसूल विभागात सर्वाधिक लाचखोर

महसूल विभागाने यंदा लाचखोरीत बाजी मारली असून, ६ गुन्ह्यांत ९ आरोपींना अटक झाली. अन्न व औषध प्रशासन विभागातील ४ गुन्ह्यांमध्ये चौघांवर कारवाई सुरू आहे. पोलिस दलातील तिघांवर लाचखोरीचा गुन्हा दाखल आहे. एकूण २८ लाचखोरांमध्ये २५ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अशा झाल्या कारवाया

विभाग - गुन्हे - आरोपी
महसूल - ६ - ९
अन्न व औषध प्रशासन - ४ - ४
पोलिस - ३ - ३
भूमी अभिलेख - २ - ४
महावितरण - १ - २
ग्रामविकास - १ - २
महिला आर्थिक विकास महामंडळ - १ - २
जीएसटी - १ - १
प्रशासन लॉ कॉलेज - १ - १


लाचखोरीचे प्रकार रोखण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांबाहेर फलक लावून तक्रारी करण्याचे आवाहन केले आहे. लाचेची मागणी होताच नागरिकांनी आवर्जून तक्रारी द्याव्यात. दोषींचा बंदोबस्त केला जाईल. - वैष्णवी पाटील, पोलिस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Web Title: Revenue department at the forefront of bribery in Kolhapur, Police in third place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.