Kolhapur Crime: डिजिटल अरेस्टची भीती घालून सेवानिवृत्त प्राध्यापकाला ७९ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:33 IST2025-12-16T12:32:06+5:302025-12-16T12:33:20+5:30
व्हॉट्सॲप कॉलवरून पोलिस स्टेशन, न्यायालयाचे सेट दाखवले. अटक वॉरंट, मनी लाँड्रिंगची कागदपत्रे पाठवली

संग्रहित छाया
कोल्हापूर : नरेश गोयल मनी लाँड्रिंग केसमध्ये तुमच्या आधार कार्डचा वापर झाला आहे. याप्रकरणी डिजिटल अरेस्ट केल्याची भीती घालून सायबर चोरट्यांनी सेवानिवृत्त प्राध्यापकांना ७९ लाखांचा गंडा घातला. हा प्रकार २९ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान घडला.
याबाबत फसवणूक झालेल्या सेवानिवृत्त प्राध्यापकांनी सोमवारी (दि. १५) राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी उमेश मच्छिंद्र याच्यावर गुन्हा दाखल केला असून, १६ लाख ४५ हजार ६५९ रुपयांची रक्कम गोठवली.
राजारामपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजारामपुरी येथील १३ व्या गल्लीत राहणा-या सेवानिवृत्त प्राध्यापकांना २९ नोव्हेंबर रोजी मोबाइलवर फोन आला. तुमचे सीमकार्ड २४ तासांत बंद होणार असल्याचे सांगून त्यांनी कुलाबा पोलिस स्टेशनच्या नावे व्हॉट्सॲपवर मेसेज केला. त्यानंतर उमेश मच्छिंद्र नावाच्या व्यक्तीने व्हिडिओ कॉल करून आपण पोलिस अधिकारी असल्याचे सांगत ५३८ कोटींच्या नरेश गोयल मनी लाँड्रिंग प्रकरणात तुमच्या आधार कार्डचा वापर झाल्याचे सांगितले.
या गुन्ह्याच्या चौकशीसाठी डिजिटल अरेस्ट केल्याची भीती घालून त्याने नातेवाईक आणि बँक खात्यांची माहिती काढून घेतली. त्यानंतर वेळोवेळी व्हॉट्सॲप कॉल करून त्यांना आरटीजीएस आणि नेट बँकिंगद्वारे काही खात्यांवर पैसे वर्ग करण्यास भाग पाडले.
अटकेच्या भीतीने त्यांनी २९ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान स्वत:सह पत्नीच्या खात्यांवरील ७८ लाख ९० हजार रुपये सायबर चोरट्यांच्या खात्यांवर वर्ग केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.
पोलिस स्टेशन, न्यायालयाचा सेट
आरोपींनी डिजिटल अरेस्टची भीती घालण्यासाठी सेवानिवृत्त प्राध्यापकांना व्हॉट्सॲप कॉलवरून पोलिस स्टेशन आणि न्यायालयाचे सेट दाखवले. त्यांना व्हॉट्सॲपवर अटक वॉरंट, रिझर्व्ह बँकेचे पत्र आणि मनी लाँड्रिंगची कागदपत्रेही पाठवली. न्यायालयातील सुनावणीचा बनाव त्यांनी केला. त्यामुळे फिर्यादी त्यांच्या जाळ्यात अडकत गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
काही रक्कम वाचली
फिर्यादींनी फसवणुकीची हाकिकत सांगताच गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी तातडीने सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार करून आरोपींची बँक खाती गोठवली. यामुळे फिर्यादींचे १६ लाख ४५ हजार ६५९ रुपये वाचवण्यात पोलिसांना यश आले.
पुन्हा प्राध्यापक फसले
गेल्या चार महिन्यांत चार सेवानिवृत्त प्राध्यापक सायबर चोरट्यांच्या गळाला लागले. त्यांनी आयुष्यभर कमावलेली कमाई काही क्षणात गायब झाली. अनेक ट्रेडिंग कंपन्या, जादा परताव्याचे आमिष दाखवणारे एजंट हातोहात प्राध्यापकांना गंडा घालत असल्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. आता पुन्हा प्राध्यापक फसल्याने याची चर्चा सुरू झाली आहे.