कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६८ गटांचे आरक्षण जाहीर; शौमिका महाडिक, इंगवले, अंबरिश यांचे मतदारसंघ आरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 11:47 IST2025-10-14T11:46:25+5:302025-10-14T11:47:38+5:30

उमेश आपटे, बजरंग पाटील, शशिकांत खोत, पेरिडकर, हंबीरराव, बोरगे, कोलेकर, रोहिणी आबिटकर, स्वरूपाराणी जाधव, रेश्मा देसाई यांना पुन्हा संधी

Reservation of 68 groups of Kolhapur Zilla Parishad announced The constituencies of Shaumika Mahadik, Ingwale, Ambarish are reserved | कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ६८ गटांचे आरक्षण जाहीर; शौमिका महाडिक, इंगवले, अंबरिश यांचे मतदारसंघ आरक्षित

छाया-आदित्य वेल्हाळ

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ६८ गटांचे आरक्षण सोमवारी जाहीर करण्यात आले. दिग्गजांचे मतदारसंघ आरक्षित झाले असून लढाईआधीच अनेकांना शस्त्रे म्यान करावी लागली आहेत. चंदगड आणि भुदरगड तालुक्यांतील प्रत्येकी चारही गटांमध्ये महिलांना संधी मिळाली असून या ठिकाणी एकही जागा सर्वसाधारण राहिली नाही.

ताराराणी सभागृहात ही प्रक्रिया पार पडली. त्यानुसार सुरुवातीला लोकसंख्येच्या प्रमाणात ९ गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आले. त्यामध्ये भादोले, आळते, रूकडी, रूई, कबनूर, पट्टणकोडोली, दानोळी, अब्दुललाट, कसबा सांगाव या गटांचा समावेश होता तर यातील पाच सोडतीनुसार महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी नांदणी हा गट निश्चित करण्यात आला.

जिल्हा परिषद निवडणूक १९६१ च्या तरतुदीनुसार एकूण जागांच्या २७ टक्के जागा म्हणजे १८ गट सोडतीद्वारे इतर मागासासाठी निश्चित करण्यात आल्या आणि त्यातील ९ महिलांसाठी आरक्षित झाल्या तर उर्वरित सर्वसाधारण ४० पैकी १९ महिलांसाठी आरक्षित झाल्या आणि २१ अनारक्षित राहिल्या.

शौमिका महाडिक, अरूण इंगवले, अंबरिश घाटगे, विजय भोजे, युवराज पाटील, सतीश पाटील, प्रवीण यादव,मनोज फराकटे, पद्माराणी पाटील, मनिषा माने यांचे मतदारसंघ आरक्षित झाले आहेत तर माजी अध्यक्ष उमेश आपटे, बजरंग पाटील, माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, माजी सभापती सर्जेराव पेरिडकर, हंबीरराव पाटील, विजय बोरगे, हेमंत कोलेकर, रोहिणी आबिटकर, स्वरूपाराणी जाधव, रेश्मा देसाई यांना पुन्हा संधी मिळाली आहे.

करवीरमध्ये अटीतटीच्या लढती, तिरंगी लढतीची शक्यता

करवीर तालुक्यातील १२ पैकी ७ गट खुले झाल्याने या तालुक्यात अटीतटीच्या लढती पाहावयास मिळतील. चंद्रदीप नरके, अमल महाडिक आणि सतेज पाटील हे तीन आमदार आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या गटातील लढती लक्षवेधी ठरणार असून भाजप कोणाबरोबर कुठे युती करणार याचीही उत्सुकता आहे. माेठी गावे, गावपातळीवरील तुल्यबळ नेते त्यामुळे ‘करवीर’चे जिल्हा परिषदेचे रणांगण चांगलेच गाजण्याची चिन्हे आहेत.

हातकणंगलेत दिग्गजांना झटका

११ पैकी ६ गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने आता ताकदीच्या उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. या तालुक्यांतून याआधी अध्यक्ष झालेल्या शौमिका महाडिक, ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले, प्रवीण यादव, प्रसाद खोबरे, माजी सभापती वंदना मगदूम, माणगावचे सरपंच राजू मगदूम, माजी सदस्य प्रसाद खोबरे, पुष्पा आळतेकर, विजया पाटील, पद्माराणी पाटील, मनिषा माने यांची संधी हुकली आहे.

चंदगडला, भुदरगडला लाडकी बहीण जोरात

चंदगड आणि भुदरगडमधील प्रत्येकी चारही गट महिलांसाठी राखीव झाल्याने लाडक्या बहिणी जोरात आहेत. चंदगडमधील कुदनुर आणि अडकूर हे दोन सर्वसाधारण महिलांसाठी तर उर्वरित दोन माणगाव आणि तुडये इतर मागास महिलेसाठी आरक्षित आहेत. अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या भुदरगड तालुक्याकडे सर्वांचे लक्ष राहील. त्यांच्या भावजय रोहिणी आबिटकर, बजरंग देसाई यांच्या स्नुषा रेश्मा देसाई आणि दिनकरराव जाधव यांच्या स्नुषा स्वरूपाराणी यांनी पुन्हा रिंगणात उतरण्याची संधी आहे.

शाहूवाडीत जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी मिळणार

माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरिडकर, हंबीरराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे यांना पुन्हा रिंगणात उतरण्याची संधी असून येथे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत रंगेल असे चित्र आहे.

शिरोळमध्ये नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी

शिरोळ तालुक्यात सात जिल्हा परिषद गट असून, आलास खुला, तर दत्तवाड महिलांसाठी खुला झाल्याने याठिकाणी काँटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे. माजी सभापती स्वाती सासने, शुभांगी शिंदे, माजी सदस्य विजय भोजे, राजवर्धन नाईक-निंबाळकर यांची संधी हुकली आहे.

पन्हाळ्यातील जिल्हा परिषदेचे इच्छुक पंचायत समितीला

पन्हाळ्यात सहा जिल्हा परिषद मतदारसंघ असून कोडोली, सातवे आणि पोर्ले तर्फ ठाणे हे मतदारसंघ खुले झाल्याने येथे चुरस बघायला मिळणार आहे. निवडणुकीच्या तयारीने काम करत असलेल्या इच्छुकांची आरक्षणानंतर कोंडी झाल्याने कदाचित जिल्हा परिषदेचे इच्छुक पंचायत समितीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असे लढतीचे चित्र राहते की त्याला फाटे फुटणार आहे हे लवकरच कळणार आहे.

दोन मंत्री, एका आमदारांमुळे आजऱ्यात चुरस

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मतदारसंघातील आजरा तालुक्यात दोन जागांसाठी संघर्ष उफाळणार आहे. येथील एक मतदारसंघ कमी झाल्याने आधी पदे भूषविलेल्यांना पदे मिळणार की नव्या कार्यकर्त्यांना संधी हे लवकरच स्पष्ट होणार आहे. परंतु मतदारसंघच मोठे झाल्याने ‘क्षमता’ असणाऱ्यांचा विचार होईल असे दिसते.

राधानगरीत महायुतीमध्ये लढत, काँग्रेसही तुल्यबळ

राधानगरी तालुक्यात पाच जिल्हा परिषद गट असून, राधानगरी व राशिवडे बुद्रुक सर्वसाधारण खुला झाल्याने येथे तुल्यबळ लढती होणार आहेत. या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिंदेसेना, के. पी., ए.वाय. यांची राष्ट्रवादी आणि तुल्यबळ काँग्रेस यांच्यातील लढती लक्षवेधी ठरणार आहेत. गेली पाच वर्षे जिल्हा परिषद निवडणूक लढवायची या तयारीने मतदारसंघ पिंजून काढणारे अभिषेक डोंगळे यांच्या पुढे पेच निर्माण झाला आहे.

गडहिंग्लज तालुक्यात स्थानिक आघाड्यांमध्येच रस्सीखेच

‘सर्वसाधारण प्रवर्गा’साठी खुले झालेल्या नेसरी, भडगाव व हलकर्णी मतदारसंघात चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातच सामना अपेक्षित असला तरी गेल्यावेळीप्रमाणेच सोयीच्या स्थानिक आघाडीच्या माध्यमातूनच ही निवडणूक लढवली जाईल असे सध्याचे चित्र आहे. आरक्षणामुळे माजी जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांची संधी हुकली. मात्र, त्यांच्या पत्नी पुन्हा रिंगणात उतरू शकतात. तर दिग्विजय कुराडे यांना पुन्हा पुढच्या निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे. नेसरीत उमेदवारीसाठी भाजपच्या हेमंत कोलेकर, संग्राम कुपेकर यांच्यात संघर्ष होऊ शकतो.

गगनबावड्यात राजकीय समीकरणे बदलणार

गगनबावड्यातील आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. सतेज पाटील गट आणि पी. जी. शिंदे गटातील जुनी लढत पुन्हा रंगण्याची चिन्हे असून, यावेळी नव्या चेहऱ्यांनाही मैदानात उतरण्याची संधी मिळणार आहे.
‘महायुती विरुद्ध महाआघाडी’ अशी लढत होण्याची शक्यता असली तरी, चंद्रदीप नरके गटाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

कागलमध्ये नेत्यांच्या मुलांसमोर अडचणी

कागल तालुक्यातील जिल्हा परिषदेचे सहाच्या सहा गट राखीव झाल्याने नेत्यांच्या मुलांसमोर अडचणी आल्या निर्माण झाल्या आहेत. एकही सर्वसाधारण खुला प्रवर्गाचा गट नसल्याने निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या प्रस्थापित मातब्बरांना धक्का बसला आहे. त्यामुळे यातील काही जण आता पंचायत समितीकडे लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे. माजी सभापती युवराज पाटील, अंबरिश घाटगे, इच्छुक वीरेंद्र मंडलिक यांना फटका बसला आहे.

Web Title : कोल्हापुर जिला परिषद: आरक्षण घोषित, प्रमुख नेताओं के निर्वाचन क्षेत्र आरक्षित

Web Summary : कोल्हापुर जिला परिषद के 68 समूहों का आरक्षण घोषित, जिससे राजनीतिक दिग्गजों पर असर पड़ेगा। कई प्रमुख नेताओं के निर्वाचन क्षेत्र आरक्षित, जिससे चुनाव गतिशीलता बदल जाएगी। चंदगढ़ और भुदरगढ़ में महिलाओं को महत्वपूर्ण अवसर मिले।

Web Title : Kolhapur Zilla Parishad: Reservation Announced, Key Leaders' Constituencies Reserved

Web Summary : Kolhapur Zilla Parishad's 68 group reservations declared, impacting political heavyweights. Several prominent leaders' constituencies are reserved, altering election dynamics. Women gain significant opportunities in Chandgad and Bhudargad.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.