गुणवत्तापूर्ण संशोधनाने पातळी उंचावली, कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ १६२ पेटंटचे मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:12 IST2025-11-18T12:10:32+5:302025-11-18T12:12:08+5:30
विद्यापीठाचा आज वर्धापनदिन : बौद्धिक संपदा कक्षामुळे पेटंट मिळवणाऱ्यांची संख्या वाढली

गुणवत्तापूर्ण संशोधनाने पातळी उंचावली, कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ १६२ पेटंटचे मानकरी
कोल्हापूर : नव्या शैक्षणिक धोरणात संशोधनाला चालना देण्यासाठी पावले उचलली जात असली तरी शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील संशोधक प्राध्यापकांनी आतापर्यंत तब्बल १५६ पेटंट मिळवत या संशोधनाला अधिक बळ दिले आहे. शिवाय संशोधक प्राध्यापकांनी आतापर्यंत ६ कॉपीराइटही घेतले आहेत. विद्यापीठाचा आज मंगळवारी ६३ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. सहा दशकांच्या काळात विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच संशोधनाची पातळीही उंचावली. या पेटंटमध्ये भारताबरोबरच युके, जर्मन पेटंटचाही समावेश आहे.
विद्यापीठात बौद्धिक संपदा हक्क कक्ष हा स्वतंत्र विभाग असून या विभागाच्या माध्यमातून संशोधकांना पेटंट घेण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. संशोधकांना सर्व प्रकारचे साहाय्य केले जात असल्याने पेटंटची संख्याही वाढत आहे. विद्यापीठाच्या अधिविभागातील संशोधक प्राध्यापकांना भारत सरकारबरोबरच इतर देशातील पेटंट कार्यालयाकडून दाखल संशोधनास १५६ स्वामित्व हक्क (पेटंट) देण्यात आले आहेत.
हे स्वामित्व हक्क दिल्यानंतर संबंधित संशोधनावर पूर्णपणे हक्क संशोधकाचा राहिला आहे. विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनाचा उपयोग समाज व उत्पादनाच्या निर्मितीसाठी होत असून, या माध्यमातून शेकडो स्टार्टअप सुरू करण्यात आले आहेत. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, तंत्रज्ञान, वनस्पतिशास्त्र, बायोकेमिस्ट्री, संगणकशास्त्र या विषयांमध्ये हे पेटंट मिळाले आहेत.
संशोधन प्रोत्साहन योजनेचेही बळ
देशात वैज्ञानिक वातावरण निर्माण व्हावे व विविध स्तरांवर संशोधन करून अधिकाधिक स्वामित्व हक्क (पेटंट) विद्यार्थ्यांच्या नावावर यावेत, या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे गेल्या दशकापासून विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संशोधन प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आल्या आहेत. याचाही सकारात्मक परिणाम पेटंट मिळवण्यात झाला आहे.
दृष्टिक्षेपात पेटंट
अधिविभाग - मिळालेले पेटंट
- भौतिकशास्त्र - ३९
- रसायनशास्त्र - ३८
- तंत्रज्ञान - २१-०९
- वनस्पतिशास्त्र - ०७
- इतर - ०५
- संगणकशास्त्र - ०५
- इलेक्ट्रॉनिक्स - ०४
- बायोकेमिस्ट्री - ०२
आयपीआर पेटंट - मिळालेले पेटंट
- इंडियन - ४५
- यूके - १३
- जर्मन - ४
शिवाजी विद्यापीठातील शिक्षक आणि संशोधक विद्यार्थी सातत्याने उच्च दर्जाचे व नावीन्यपूर्ण उपयोजित संशोधन करत आहेत. विद्यापीठाच्या बौद्धिक संपदा धोरणामुळे संशोधकांना पेटंट अर्जासाठी आवश्यक आर्थिक साहाय्य उपलब्ध होते. यामुळेच विद्यापीठातील पेटंट्सची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. - डॉ. गजानन राशीनकर, संचालक, बौद्धिक संपदा कक्ष, शिवाजी विद्यापीठ.