कोल्हापूर हद्दवाढीतील गावांच्या सुविधांचा अहवाल महापालिकेला सादर, जिल्हा परिषदेकडून प्रक्रिया पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 12:24 IST2025-07-16T12:23:30+5:302025-07-16T12:24:07+5:30
काय आहे अहवालात..

कोल्हापूर हद्दवाढीतील गावांच्या सुविधांचा अहवाल महापालिकेला सादर, जिल्हा परिषदेकडून प्रक्रिया पूर्ण
कोल्हापूर : जिल्हा परिषदेकडून संभाव्य हद्दवाढीतील आठ गावांबाबतचा अहवाल मंगळवारी जिल्हा परिषदेने महापालिकेला सादर केला. यात संबंधित आठ गावांमधील केवळ मूलभूत सोयीसुविधांची माहिती देण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी ही माहिती दिली.
आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांचा संदर्भ देऊन उचगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, पाचगाव, मोरेवाडी, कळंबा, बालिंगा मूळ गावठाण वगळून, पाडळी मूळ गावठाण वगळून या आठ गावांचा कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीमध्ये समावेश व्हावा, यासाठीची प्रक्रिया सुरू करण्याबाबत कोल्हापूर महापालिकेला पत्र दिले होते. त्यानुसार या प्रक्रियेचा भाग म्हणून महापालिकेने जिल्हा परिषदेला पत्र देऊन या आठ गावांविषयीच्या माहितीचा अहवाल मागवला होता.
त्यानुसार कार्तिकेयन यांनी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांना याबाबतच्या माहिती संकलनाच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्राथमिक माहिती संकलित करण्यात आली आणि अंतिम अहवाल महापालिकेला सादर करण्यात आला.
काय आहे अहवालात..?
या अहवालामध्ये गावांची लोकसंख्या, क्षेत्र, रस्त्यांचे क्षेत्र, प्रशासकीय इमारती, पाण्याची सुविधा, शहरापासूनचे अंतर, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना याची माहिती देण्यात आली आहे.
अहवाल तयार झाल्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा करून तो अंतिम करण्यात आला. जिल्हा परिषदेचे सभागृह सध्या अस्तित्वात नाही. त्या त्या गावांची हद्दवाढीबाबतची नेमकी भूमिका याबाबत जिल्हा परिषद कोणता निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे या गावांतील सर्व प्राथमिक माहितीचे संकलन करून तसा अहवाल महापालिकेला सादर करण्यात आला आहे. - कार्तिकेयन एस. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर