Kolhapur: गुंडप्रवृत्ती हटवा...जोतिबावर पगारी पुजारी नेमा; परितेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 11:45 IST2026-03-31T11:44:09+5:302026-03-31T11:45:39+5:30
यात्रा झाल्यावर चौकशी करून योग्य कारवाई : जिल्हाधिकारी

छाया : नसीर अत्तार
कोल्हापूर : श्री जोतिबा मंदिरातील गुंड प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांची कायमस्वरुपी हकालपट्टी करून पंढरपूरच्या धर्तीवर मोजक्या पुजाऱ्यांची पगारी नियुक्ती करा, भाविकांना मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी सोमवारी परितेसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी जोतिबा यात्रा झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन दिले.
परिते गावच्या वार्षिक यात्रेनिमित्त २२ तारखेला ५०० ग्रामस्थ जोतिबावर सासनकाठी पूजनासाठी आले होते. त्यावेळी हलगी वादनावरून पुजारी व ग्रामस्थांमध्ये झालेल्या वादाचे मारहाणीत रूपांतर झाले. पुजाऱ्यांनी भाविकांना बेदम मारहाण केलीच; शिवाय भाविकांनी मद्यप्राशन केल्याची बदनामी केली. यामुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी पुजारी हटावची हाक दिली होती. परितेच नव्हे तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांनी अन्य जिल्ह्यातील भाविकांनीदेखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
सोमवारी सकाळी ग्रामस्थ मोर्चा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आले. येथे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष राहुल पाटील, परिते गावचे सरपंच मनोज पाटील, शेतकरी सेनेचे राज्यसचिव जनार्दन पाटील यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी येडगे यांना निवेदन दिले. यावेळी मंदिरातील पुजारी हटवून सरकारी पगारी पुजारी नेमावेत तसेच मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
वाचा: ‘लोकमत’चे फलक मोर्चात उत्स्फूर्तपणे झळकले, दांभिकतेला चपराक दिल्याची मोर्चेकऱ्यांची भावना
यासह पुजाऱ्यांशी आर्थिक व्यवहार केल्यावर थेट दर्शन देण्याची पद्धत तत्काळ बंद करावी, प्रशासनाच्या दानपात्राव्यतिरिक्त अन्य देणगी पात्रे हटवावीत या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावर जिल्हाधिकारी येडगे यांनी जोतिबा यात्रा संपल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी अजित पाटील, सर्जेराव पाटील, सुनील कारंडे, विलास पाटील आदी उपस्थित होते.
मोर्चातील घोषणा
भाविकांना अमानुष मारहाण करणाऱ्या पुजाऱ्यांना अटक झालीच पाहिजे, नाही चालणार नाही चालणार दादागिरी नाही चालणार, सर्वसाक्षी जगती ज्याची त्याला नको मध्यस्थी, भक्तांना न्याय मिळालाच पाहिजे. गब्बर पुजारी हटाव..जोतिबा मंदिर बचाव, जोतिबा देवाला पुजाऱ्यांच्या जोखडातून मुक्त करू अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.