कोल्हापूर : गेल्या ४० वर्षांपासून अंबाबाई मंदिर परिसरात फेरीवाले व्यवसाय करत आहेत. मुंबईतील एक निकालाचा आधार घेऊन महापालिका येथे कारवाई करू शकत नाही. मुंबई आणि कोल्हापुरातील परिस्थीत भिन्न आहे. मंदिर परिसरातून एकाही फेरीवाल्यास हटवल्यास याद राखा, असा इशारा सर्व पक्षीय फेरीवाला कृती समितीने मंगळवारी दिला.
कोल्हापूर महापालिकेने शहरातील अतिक्रमणावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून अंबाबाई मंदिराच्या १०० मीटरपर्यंतच्या सर्व फेरीवाल्यांना हटविण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने मंगळवारी मंदिराच्या १०० मीटर पुढे येथील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी ताराबाई रोड येथे पट्टे मारण्यास सुरू केले. फेरीवाल्यांनी तसेच तेथील दुकानदारांही याला विरोध केला. फेरीवाला कृती समितीने पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी महाराणा प्रताप चौकात बेठक घेतली.
समितीचे निमंत्रक आर.के. पोवार म्हणाले, महापालिका प्रशासन फेरीवाल्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी पत्र देऊनही चर्चा करण्यास तयार नाही. समिती सोबत चर्चा झाल्याशिवाय कारवाई करू नये ही भूमिका असतानाही प्राशसनाकडून अंबाबाई मंदिर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करत असून पट्टे मारण्याचे काम सुरू केले, हे चुकीचे आहे. येथील फेरीवाले अनेक वर्षांपासून व्यवसाय करत असून त्यांना हटवणे योग्य होणार नाही.
माजी नगरसेवक अजित ठाणेकर म्हणाले, कायदाच्या रचनेप्रमाणे अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई होता कामा नये. कोरोनामुळे वर्षानंतर फेरीवाल्याचे व्यवसाय सुरू झाला असून महापालिकेने त्यांच्या पोटावर पाय आणू नये. दिलीप पवार म्हणाले, फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. फेरीवाले झोन, बायोमेट्रिक कार्ड वाटप झालेली नाही. तरीही महापालिका मनमानी कारभार करत आहे. महापालिकेने कायदाप्रमाणे वागले पाहिजे. किशोर घाटगे यांनी न्यायालयीन, राजकीय आणि रस्त्यावर अशी तीन बाजूने लढाई लढण्याची गरज असल्याचे म्हटले. शेकापचे अस्लम बागवान यांनी कृती समितीला विश्वास घेऊनच महापालिकेने पुढील दिशा ठरवली पाहिजे अन्यथा अन्याय टोकाची भूमिका घेऊ असे म्हटले. यावेळी रघुनाथ कांबळे, प्र.द. गणपुले, रियाज कागदी, नजीर देसाई, किरण गवळी आदी उपस्थित होते.
चौकट
१०० मीटरमध्ये पार्किंगचा डाव
मंदिर परिसरातून फेरीवाल्यांना हटवून येथे पार्किंग करण्याचा डाव आहे. १९८३ ला मध्यवर्ती बसस्थानकावर असाच प्रकार झाला होता. यावेळी आंदोलन करून त्यांचा डाव हाणून पाडला. आताही तीच वेळ आली असल्याचे माजी नगरसेवक अशोक भंडारे यांनी म्हटले.
फोटो : ०९०२२०२१ कोल फेरीवाले न्यूज
ओळी : कोल्हापुरातील फेरीवाला कृती समितीने महापालिकेच्या कारवाई विरोधात पुढील दिशा ठरविण्यासाठी महाराणा प्रताप चौकात बैठक झाली. यावेळी निमंत्रक आर.के. पोवार यांनी मागदर्शन केले.
(छाया : नसीर अत्तार)